- दीड महिन्यात ४४ लाख रुपयांचा महसूल
रामटेक : शिल्लारी पेंच व्याघ्र प्रकल्प हा पेंच नदीचे खोरे , समृद्ध निसर्ग, भरपूर वन्यप्राणी तसेच जैवविविधतेने नटलेला पेंच व्याघ्र प्रकल्प सिल्लारी निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत तसेच जवळच दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली. त्याचवेळी जंगल सफारीचे आकर्षण असणाऱ्या वन्यप्रेमींनी जंगल सफारीचा आनंद लुटला. फटाक्यांमुळे सर्वत्र प्रदूषणाचा स्तर उंचावला असतांना, मोकळ्या हवेत श्वास घेण्याच्या दृष्टीने दिवाळीच्या सुट्यांमध्ये वनभ्रमंतीला पसंती दिली गेली.
त्यासाठी 'ऑनलाइन बुकिंग'मुळे सुट्यांचे नियोजन आधीच शक्य झाले. राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद ताडोब्यात असल्याने पर्यटकांची पहिली पसंती ताडोब्यालाच असते. परंतु, गेल्या काही वर्षांत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेटला वाघाचे दर्शन होत असल्याने, पर्यटक इकडे ओढले गेले आहेत. दिवाळीच्या सुट्यांमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पांत १ ऑक्टोबर ते २० नॉव्हेंबर या कालावधित ४ हजार ४२१ पर्यटकांची पावले वनाकडे वळली. त्यात ४ हजार ९७१ प्रौढ तर ४५० लहान मुलांचा समावेश होता. या माध्यमातून वनविभागाला ४४ लाख ४१ हजार २५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
परिसरातील तरुणांचे भरले खिसे
पेंच-सिल्लारी व्याघ्र प्रकल्पामुळे परिसरामधील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दीपावलीच्या सुट्टयांत भरपूर प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे जिप्सी चालकांना २४ लाख ७ हजार ५०० तर गाईड्सला २ लाख ८२ हजार १५० रुपये उत्पन्न झाले. कॅमेरा फोटोग्राफर्सला ४७ हजार २०० रुपये उत्पन्न झाले आहे. हा सगळा खर्च वजा करता शासनाला १७ लाख ५ हजार ४०० रुपये शुद्ध महसूल प्राप्त झाल्याची माहिती पेंच सिल्लारी व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांनी दिली.
पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे घडते दर्शन
पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी वनपरिक्षेत्रात एकूण २६ वाघ आहेत. त्यात १० मादी, ७ नर वाघ, ६ मादी बछड्यांचा तर ओळख नसलेली एक मादी व दोन नर वाघांचा समावेश आहे.