नागपूर : गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने नवीन कामठी ठाण्यांतर्गत गस्तीदरम्यान उत्तर प्रदेशातील एका टोळीला दरोड्याच्या तयारीत पकडले. पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून शस्त्रास्त्रासह 15 लाख 44 हजार 600 रुपयांचा माल जप्त केला. ही टोळी कुठेतरी मोठा दरोडा टाकण्याचा तयारीत होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. इरशाद अली नौशाद अली (30), बद्रुद्दीन इदरीस चौधरी (34), विनोद राजमन गौतम (32), मोहम्मद शरीफ नुसरत अली (21) आणि फरियाद अशरफ अली चौधरी (27), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत.
शनिवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास पोलिस पथक कामठी परिसरात गस्त घालत होते. गादा गाव मार्गावर पोलिसांना एक कार आणि पिकअप वाहनात काही लोक संशयास्पदरित्या जाताना दिसले. घेराबंदी करून पोलिसांनी वरील पाचही आरोपींना पकडले. झडतीमध्ये त्यांच्याजवळ दोन चाकू, पेचकस, तीन कटर आणि तिखट मिळाले. त्यांना ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता आरोपींवर सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. आरोपी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन घरफोडी करतात. आरोपी एटीएम फोडण्याच्या तयारीने शहरात फिरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट आणि दरोड्याच्या तयारीचा गुन्हा नोंदवून नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ही कारवाई पोनि राहुल शिरे, सपोनि विक्रांत थारकर, पोउपनि आशीषसिंग ठाकुर, पोहवा प्रमोद वाघ, महादेव थोटे, राजूसिंग राठोड, गौतम रंगारी, रामचंद्र कारेमोरे, रोनाल्डो एंथोनी, टप्पूलाल चुटे, सुशील गवई, सुशील श्रीवास, आशीष पवार आणि सुधीर तिवारी यांनी केली.