- हाऊसफुल्ल गर्दीने गाजला खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दुसरा दिवस
नागपूर : सौंदर्य आणि सुरेल आवाजाची धनी सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या गायकीत नागपूरकर रसिक रंगले, गुंगले. टाळ्या, शिट्ट्यांनी संपूर्ण पटांगण दणाणून गेले. प्रसंग होता खासदार सांस्कृतिक महोत्सवातील शनिवारी प्रस्तुत झालेल्या श्रेया घोषाल यांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ चा.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारचा दुसरा दिवस होता. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, बैद्यनाथ समूहाचे प्रमुख सुरेश शर्मा, हॉटेल अशोकाचे संजय गुप्ता, नवभारतचे संचालक वैभव माहेश्वरी, विंग कमांडर रत्नाकर सिंग यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्रेया घोषाल यांना ऐकण्यासाठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून आला. कार्यक्रमाच्या पासेस प्राप्त करण्यासाठी कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच गर्दी बघायला मिळाली. सायंकाळी पटांगण हाऊसफुल्ल झाले होते. या गर्दीला संबोधित करताना श्रेया घोषणा म्हणाल्या, एवढा मोठा सुरेल श्रोत्यांचा सागर बघून खूप आनंद झाला. नागपूरचा श्रोता दर्दी असल्यामुळे येथे वारंवार यावेसे वाटते.
‘नजर जो तेरी लागी’ या गीताने श्रेयाने यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘कहते है ये दिवानी मस्तानी हो गई’ हे गीत सादर केले. ‘बहारा बहारा’ हे गीत सादर करून श्रेयाने कार्यक्रमात बहार आणली. ‘तुम क्या मिले या’ गीताने कार्यक्रमात रंग भरले. बेपनाह प्यार है आजा, बदमाश दिल, मै वारी जावाची मेडले, तेरी और तेरी और आदी गीतांची मिडले सादर केली. सहगायक किंजलसोबत अधीर मन झाले तसेच, ‘जोगवा’ चित्रपटातील ‘जीवन रंगला, गुंगला’ हे गीत सादर करून मराठी मनाला खूश केले. राबता, नान्ना रे नान्ना रे, घर मोरे परदेसीया या गीतांवर रसिकांना थिरकायला भाग पाडले. नितीन गडकरी यांच्या हस्ते श्रेया व इतर सर्व वाद्यकलाकारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ॲड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन - नितीन गडकरी
खासदार सांस्कृतिक महोत्सवातील सर्वच कार्यक्रमांना जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असून हा उपक्रम यशस्वी होत आहे. नागपुरातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे काम या महोत्सवाद्वारे केले जात आहे. सर्व भाषा, संस्कृतीचा समावेश असलेला हा महोत्सव आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
श्री हनुमान चालिसा पठणाने वातावरण झाले भक्तीमय
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दुस-या दिवशीची पहाट श्री हनुमान चालिसा पठणाने भक्तीमय झाली. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी सुमारे 1000 भाविकांनी एक सूर आणि एक तालात ‘जय हनुमान ज्ञान गुन सागर’ चा जागर करीत वातावरण पवित्र केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित ‘जागर भक्तीचा’ या सकाळच्या सत्रातील उपक्रमाला शनिवारी श्री हनुमान चालिसा पठणाने प्रारभ झाला. सकाळच्या सत्रातील या उपक्रमासाठी सहा वाजेपासूनच ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरात हनुमानभक्तांची गर्दी जमायला प्रारंभ झाला होता.
पोद्दारेश्वर राम मंदिराचे संस्थापक रामकृष्ण पोतदार यांच्या हस्ते श्री हनुमानजींच्या प्रतिमेच्या पूजनाने पठणाला प्रारंभ करण्यात आला. वेद फाऊंडेशनचे अध्यक्ष खेमराज दमाहे यांच्या संयोजनात व जय श्रीराम सेवा संघटनेचे तेजांश दीक्षित व चमूच्या सहकार्याने भाविकांनी श्री हनुमान चालिसाची पाच आवर्तने एका सुरात सादर केली. एक तास चाललेल्या या पठणाने परिसरातील वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाला कांचनताई गडकरी व खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.