‘राष्‍ट्रसंत तुकडोजी’ संकेतस्‍थळाचे 27 रोजी विमोचन

    26-Nov-2023
Total Views |
  • खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या मंचावर होणार विमोचन
rashtrasant-tukdoji-maharaj-website-launch - Abhijeet BHarat
 
नागपूर : मानवतेचे पुजारी, सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या, मनामनात राष्‍ट्रभक्‍ती रुजविणाऱ्या राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय पोहोचावे, या उद्देशाने ‘राष्‍ट्रसंत तुकडोजी’ या संकेतस्‍थळाची निर्मिती करण्‍यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव - 2023 च्‍या मंचावर सोमवार, 27 नोव्‍हेंबर रोजी या सायंकाळी 6.30 वाजता या संकेतस्‍थळाचे विमोचन करण्‍यात येणार आहे.
 
श्रीगुरुदेव सेवा मंडळ, नागपूरतर्फे ‘rashtrasanttukdoji.com’ हे संकेतस्‍थळ तयार करण्‍यात आले असून यात राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूळ छायाचित्रे, व्हिडिओ यांचा समावेश करण्‍यात आला आहे. याशिवाय, राष्‍ट्रसंतांचे ‘सबके लिए खुला है’, ‘कशाला काशी जातो रे बाबा’ सारख्‍या हिंदी व मराठी भाषेतील भजनेदेखील संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. खेड्यांच्‍या उन्‍नतीसाठी राष्‍ट्रसंतांनी लिहिलेली ‘ग्रामगीता’ पीडीएफ फॉरमॅटमध्‍ये या संकेतस्‍थळावर बघायला मिळेल. याशिवाय, राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्‍लभभाई पटेल आदी मान्‍यवरांनी राष्‍ट्रसंताबद्दल काढलेल्‍या गौरवोद्गारांचाही या संकेतस्‍थळात समावेश करण्‍यात आला आहे.
 
राष्‍ट्रसंतांच्‍या विचारांनी प्र‍भावित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अत्‍यंत संवेदनशील व कृतिशील असून आमच्‍या विनंतीला मान देऊन त्‍यांनी राष्‍ट्रसंतांचे तत्‍वज्ञान व्‍यापक व्‍हावे, या उद्देशाने या संकेतस्‍थळाच्‍या निर्मितीमध्‍ये मोलाचे सहकार्य दिले, त्‍याबद्दल आम्‍ही त्‍यांचे आभारी आहोत, असे श्रीगुरुदेव सेवा मंडळ, नागपूरचे अध्‍यक्ष ॲड. अशोक यावले म्‍हणाले.