- नागपूर शहरातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
नागपूर :
केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. शुक्रवार रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दाभा येथील ॲग्रोव्हिजन प्रदर्शनीच्या मैदानावरून नागपूर शहरातील नागपूर महानगरपालिकेच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.
याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त रवींद्र भेलावे, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये योजनाची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात दोन रथांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून मनपाच्या विविध झोन मध्ये रवाना केले. या रथांच्या माध्यमातून मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जाणार आहे. मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. संबंधित विभागांच्या समन्वयाने प्रत्येक झोनस्तरावर रथयात्रेद्वारे करण्यात येणार आहे.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’च्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच नागपूर शहरातील नागरिकांना योजनांमुळे मिळालेला लाभ आणि त्यामुळे झालेला फायदा याचे कथन लाभार्थी करतील. याशिवाय विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध योजनांत पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जाणार आहे. वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य केले जाणार असून, ही यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत विविध ठिकाणी भेट देणार आहे.