नागपूर :
रोटरी क्लब ऑफ नागपूर साउथने नागपूरचा ॲथलीट ओजस देवतळे (Athlete Ojas Devtale) याचा सत्कार करून त्याला रोटरी व्होकेशन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान नुकताच प्रदान केला. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. ओजसने चीनमधील हँगझोऊ येथे नुकत्याच झालेल्या आशियाई खेळ २०२३ मध्ये तिरंदाजी स्पर्धेतील प्रत्येकी तीन प्रकारात सुवर्णपदक जिंकून देशाच्या आणि आपल्या शहराचा शिरपेचात मनाचा तुरा रोवला. यापूर्वी त्याने ऑगस्ट 2023 मध्ये बर्लिनमध्ये तिरंदाजीमध्ये जागतिक स्पर्धा जिंकली होती. सध्या ओजस जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष डॉ. उदय गुप्ते होते. ओजसचे पालक प्रविण देवतळे व अर्चना देवतळे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रोटरियन पीपी विजय सोनटक्के यांनी तिरंदाजीमधील आतापर्यंतच्या प्रवासाविषयीओजसची मुलाखत घेतली. 21 वर्षाच्या ओजस आणि त्याच्या वडिलांनी त्यांच्या संघर्षाची कहाणी याठिकाणी सांगितली. आधुनिक, स्पर्धात्मक तिरंदाजीच्या सुविधा शहरात उपलब्ध नसल्यानं ओजसला प्रशिक्षणासाठी घर सोडून साताऱ्याला जावे लागले.
प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल त्याने आपल्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक प्रवीण सावंत यांनी सुरू केलेल्या सातारा येथील दृष्टी आर्चरी अकादमीचे त्यांनी विशेष कौतुक केले. पुरस्कार समारंभाच्या आधी रोटरियन सचिन ढोमणे आणि सुरभी ढोमणे यांनी एक छोटेखानी संगीत कार्यक्रम सादर केला. ॲड. मृण्मयी कुकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव रोटरियन दीपक सोनवणे यांनी आभार मानले.