खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव - 2023 चे 24 नोव्‍हेंबर रोजी उद्घाटन

23 Nov 2023 17:09:56
  • प. पू. ज्ञानवत्‍सल स्‍वामी यांची उपस्‍थ‍िती
  • 5 डिसेंबर पर्यंत उदयोन्‍मुख कलाकारांची प्रस्‍तुती, भक्‍ती व संस्‍कृतीचा जागर
cultural-festival-nagpur-2023 - Abhijeet Bharat 
नागपूर : सर्वसमावेशकता, भव्‍यता, उत्‍कृष्‍टता व वैविधतेने नटलेल्‍या बहुप्रतिक्षित खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव - 2023 चे उद्घाटन शुक्रवार, 24 नोव्‍हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता स्‍वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्‍ते, समाजसुधारक प. पू. ज्ञानवत्‍सल स्‍वामी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्‍कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्‍यख चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्‍थ‍ित राहणार आहेत.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2017 साली खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्‍सवाचे आठवे पर्व आहे. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात होणाऱ्या या बारा दिवसीय महोत्‍सवात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या कलाकारांसोबतच स्‍थानिक उदयोन्‍मुख कलाकारांना कला सादर करण्‍याची संधी मिळणार आहे. या महोत्‍सवात भक्‍ती व संस्‍कृतीचा जागर करणारे विविध कार्यक्रम होतील. उद्घाटन कार्यक्रमानंतर संस्‍कार भारती, नागपूर प्रस्‍तुत ‘महाराष्‍ट्र माझा’ हा 900 कलाकारांचा सहभाग असलेला महाराष्‍ट्राची सांस्‍कृत‍िक व लोकधारा दर्शविणारी नाट्य, नृत्‍य व संगीतमय प्रस्‍तुती होईल.
 
नागपूर-विदर्भाची व मध्‍य भारताची शान असलेल्‍या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ॲड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांनी केले आहे.
 
उद्या महोत्‍सवात
 
सायं. 6.30 वाजता : स्‍वामीनारायण मंदिराचे डॉ. पूज्‍य ज्ञानवत्‍सल स्‍वामी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन व संस्कार भारती प्रस्तुत महाराष्‍ट्राची संस्‍कृती दर्शवणारा 900 कलाकारांचा सहभाग नाट्य, नृत्‍य व संगीतमय कार्यक्रम 'महाराष्ट्र माझा'
 
एक तास आधी स्‍थान करा निश्चित 
 
यंदाच्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्सवाला नागपूरकर जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पासेस घेण्‍यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्‍यामुळे कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेता गैरसोय टाळण्‍यासाठी रसिकांनी एक तास आधी कार्यक्रमस्‍थळी येऊन आपले स्‍थान निश्चित करावे, असे आवाहन खासदार सांस्‍कृति‍क सम‍ितीच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
 
म‍िस कॉल द्या पासेस मिळवा
 
रसिकांनी महोत्‍सवाच्‍या नि:शुल्‍क ‘ऑनलाईन’ पासेस प्राप्‍त करण्‍यासाठी 91588 80522 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. या पासेस अहस्‍तांतरणीय राहतील. ऑनलाईन पासेसचा कोटा निश्चित असून तो संपल्‍यास ऑनलाईन पासेस मिळणार नाहीत. अशावेळी, त्‍या दिवशीच्‍या कार्यक्रमाच्‍या पासेस कार्यक्रम स्‍थळी तसेच, नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, ऑरेंज सिटी चौक, नागपूर येथे सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्‍ध राहतील.
 
पार्किंग व्‍यवस्‍था
 
दोन व चार चाकी वाहनांच्‍या पार्किंगची व्‍यवस्‍था ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या आजुबाजुच्‍या परिसरात करण्‍यात आली असून ती खालीलप्रमाण राहील.
  • भैयाजी पांढरीपांडे नॅशनल इन्स्टिट्यूट
  • प्रेरणा कॉलेज
  • आयुर्वेदिक महाविद्यालय
  • मोहता सायंस कॉलेज
  • संताजी सभागृह
  • संत रविदास सभागृह
  • ईश्‍वर देशमुख कॉलेज
  • कमला नेहरू महाविद्यालय
Powered By Sangraha 9.0