नेत्री संमेलनाच्या तयारीला आला वेग

22 Nov 2023 19:04:10
  • 1200 नेतृत्वधारी महिलांची झाली नोंदणी
  • संघमित्रा सेवा प्रतिषठानचे आयोजन
women-leadership-summit-nagpur - Abhijeet Bharat 
नागपूर : समाजातील विविध क्षेत्रात आपल्या सक्षम नेतृत्वाने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कर्तुत्वधारी महिलांचे नागपूर महानगरचे नेत्री संमेलन येत्या, 10 डिसेंबर 2023 ला रेशिमबाग येथील स्मृती मंदिर येथे होणार असून या संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे.
 
संघमित्रा सेवा प्रतिषठानच्यावतीने आयोजित या संमेलनाचे तयारीसाठी बुधवारी स्मृती मंदिर येथील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विदर्भ प्रांत समंवयिका मीरा कडबे, नागपूर महानगर समन्‍वयिका ॲड. पदमा चांदेकर, संमेलन संयोजिका कल्याणी काळे व संमेलन स्वागत समिती सचिव श्रुती गांधी यांची उपस्थिती होती.
 
देशभरात सुमारे 500 महिला संमेलने घेण्यात येणार असून त्यातील 150 संमेलने पार पडली आहेत. विदर्भात विविध ठिकाणी 13 संमेलन घेण्यात येणार आहेत. राष्ट्र चेतना, राष्ट्र निर्माण मध्ये महिलांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी आयोजित या संमेलनाचा मुख्य उद्देश विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या समस्यावर चर्चा उपाययोजना करणे व कार्यकर्ता निर्माण हा मुख्य उद्देश असून या संमेलनाचा मूळ संकल्पना 'नारी से नारायणी' ही आहे, अशी माहिती मीरा कडबे यांनी दिली. आतापर्यंत 1200 महिलांनी संमेलनासाठी नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली. सहा विधानसभा क्षेत्रातून सुमारे 200 महिला संपर्क करीत आहेत.
 
संमेलनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीला माजी महापौर कल्पना पांडे, करुणा साठे प्रामुख्‍याने उपस्‍थ‍ित होत्‍या. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी वर्षा ठाकरे, सुषमा अंबुलकर, वृषाली पुणेकर, मनीषा काशीकर, अंजु घोलप आणि चमूचे सहकार्य लाभत आहे. ॲड. पद्मा चांदेकर यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन अर्चिता पांडे यांनी केले तर आभार श्रुती गांधी यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0