नागपूर : मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना महाराष्ट्र राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर इतरत्र विशेष कक्ष स्थापन केले आहे. तसेच या कक्षाला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश शिंदे समितीने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आज बुधवार 22 नोव्हेंबर 2023 पासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान आज अमरावती येथील विभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुणबी नोंदी तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबरला पुन्हा नागपुरात प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत बैठक घेण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेल्या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसुली विभाग व सर्व जिल्ह्यांमध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :
अमरावती विभाग (अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलडाणा) - बुधवार 22 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे बैठक होणार आहे.
नागपूर विभाग (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली) - गुरुवार 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे बैठक होणार आहे.
कोल्हापूर व सांगली - मंगळवार 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.
पुणे विभाग (पुणे, सातारा व सोलापूर) - बुधवार 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बैठक होणार आहे.
नाशिक विभाग (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार) - शनिवार 2 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे बैठक होणार आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी - सोमवार 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे बैठक होणार आहे.
कोकण विभाग (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड) - गुरुवार 14 डिसेंबर 2023 सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे बैठक होणार आहे. या प्रमाणे दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.