एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक भारताला मिळाला नाही, याचे बहुसंख्य देशवासियांना स्वाभाविकपणे वाईट वाटले. याचे मुख्य कारण, या स्पर्धेतील पहिले दहा सामने सलग आणि चांगल्या पद्धतीने जिंकल्यामुळे स्पर्धा आपणच जिंकू, असा विश्वास सर्वांनाच वाटत होता. तो फोल ठरल्याने निराशा झाली. पण, अंतिम सामन्याचा खेळ ज्यांनी स्वत: पाहिला, त्यांना स्पष्टपणे जाणवले की, योग्य संघच जिंकला. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि रणनीती या चारही अंगांमध्ये कांगारू संघ अव्वलच होता. त्यामुळे त्यांचे जिंकणेही नैसर्गिक होते.
परंतु, या निकालाला आता फाटे फोडले जात आहेत. त्यातील एक अंदाज असा की, भारताचा हा पराभव दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनीच घडवून आणला. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हणे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना गळ घातली आणि शहांनी त्यांचा मुलगा, बीसीसीआयचा मुख्य पदाधिकारी जय शहा याच्या मार्फत ते घडवून आणले. कारण काय? तर म्हणे, भारतच जिंकणार यावर पाकिस्तानच्या अनेक सटोडियांनी जगातील अनेक देशांमध्ये कर्ज घेऊन हजारो कोटींचा सट्टा लावला होता. ते साधले असते तर पाकिस्तानची ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारू शकली असती. म्हणून त्यांना बरबाद करण्यासाठी आपल्या लोकांनी भारताचा पराभव घडवून आणला, अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा तर्क की कल्पनाविलास आणि तो किती लोकांना पटेल, हे प्रश्नच आहेत.
सांगायचा मतलब हा की, भारत खेळात हरला, हे पचवून घ्यायची अनेकांची तयारी नाही. तर, दुसरीकडे, मोदी आणि भाजपा सरकारला बदनाम करण्यासाठी 'कुछ भी करने को तय्यार' मंडळी वेगवेगळ्या कंड्या पिकविण्यात मश्गुल आहेत. या अंतिम सामन्यात घडलेला एक प्रसंग मात्र खरोखरच क्लेशकारक आणि समस्त क्रिकेटप्रेमींनी निषेध करावा असा आहे. तो म्हणजे, ४० वर्षांपूर्वी देशाला पहिला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार कपिल देव आणि त्याच्या यशस्वी चमूला अंतिम सामन्याचे साधे निमंत्रणही देण्यात आले नव्हते, याला कृतघ्नपणाचा कहर आणि पहिल्या यशाचा अपमान, असेच म्हणावे लागेल.
यावेळी अपेक्षित असतानाही भारताला यश मिळाले नाही. याउलट, 1983 मध्ये स्वप्नात सुद्धा नसताना, पहिल्या दोन चषकांचा मानकरी असलेल्या बलाढ्य वेस्ट इंडीज संघाला धूळ चारून कपिलच्या संघाने तिसरा चषक अनपेक्षितरीत्या देशात आणून भारतीय क्रिकेटला चार चांद लावण्याची कामगिरी केली होती. त्या 'पहिल्या देवा'ची (हो. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणत असले तरी, भारतीय क्रिकेटसाठी कपिल हाच पहिला 'देव' ठरला, हे नाकारता येत नाही.) कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवून त्याच्या साथीदार सर्व खेळाडूंना सन्मानपूर्वक आमंत्रित करायला हवे होते. (पराभवाने त्यांचीही निराशाच झाली असती, हा भाग वेगळा.) असे न करून बीसीसीआयने घोडचूकच केली. देशाच्या पहिल्या विजयी चमूची आठवण ठेवू नये? हा कृतघ्नपणा, निष्काळजीपणा, दुर्लक्ष, हेळसांड, अपमान सारे काही आहे. आणि, दुर्दैवाने, कपिल देवला स्वत:च्या तोंडाने हे सांगावे लागले. तरीही त्याने अपमान गिळून अतिशय सौम्य शब्दात आपले दु:ख व्यक्त केले, हा कपिलचा मोठेपणा.
एबीपी न्यूजने अंतिम सामन्यावर एक्स्पर्ट कॉमेंट देण्यासाठी कपिलला बोलावले, तेव्हा संधी घेऊन त्याने आपली व्यथा बोलून दाखविली. कपिल म्हणाला- मला माझ्या (तेव्हाच्या) सर्व सहकाऱ्यांसोबत हा प्रवास करायचा होता. पण मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलावलं नाही. त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की, अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत 1983 ची संपूर्ण टीम असावी. परंतु, मला असं वाटतंय की, खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी विसरून जातात. या निवेदनातून कपिलने आयोजकांची लाजच राखली. तो कडाडू शकला असता, गुस्सा दाखवू शकला असता, आरोप करू शकला असता. पण, यापैकी काहीही न करता त्याने साधी तक्रार नोंदविली. कपिल दा जवाब नही.
या घटनेने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे. ती म्हणजे, क्रीडा संघटना, क्रीडा स्पर्धा आदींच्या बाबतीत किमान प्रमुख पदांवर तरी त्या त्या खेळांचे तज्ज्ञ खेळाडूच असले पाहिजे. म्हणजे असे अनावश्यक घोळ टळतील. संबंधित खेळाचा अ की ट माहीत नसणारे, राजकारणी जेव्हा खेळांचा व्यवहार नियंत्रित करतात, तेव्हा असेच वेडेवाकडे काहीतरी घडते. कपिल प्रकरणातून सरकारने एवढा धडा घेतला तरी खूप.
विनोद देशमुख,
ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.