रविवारची सकाळ उगवली ती मोठी आशा आकांक्षा घेऊन. गेल्या १२ वर्षांपासून मनात धरलेले स्वप्न साकार होणार अशी आशाच नाही तर विश्वास भारतातील १४० कोटी जनतेला होता आणि हा विश्वास सार्थच होता. कारण संपूर्ण विश्वचषकात भारत जेत्या प्रमाणे खेळला. भारताने खेळलेले सर्वच्या सर्व १० सामने जिंकले; जिंकलेच नाही तर समोरच्या संघाचे अक्षरशः पानिपत करून एकहाती जिंकले. अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियालाही साखळी सामन्यात सहज नमवले. त्यामुळे भारतच विश्वविजेता होणार असा विश्वास केवळ क्रिकेट प्रेमिंनाच नव्हे, तर या खेळातील जाणकारांनाही होता.
अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया जिंकेल असे भाकीत एकाही तज्ज्ञाने केले नव्हते. त्यामुळे दुपारी दोनच्या सामन्यासाठी १२ वाजल्यापासून प्रेक्षक टीव्हीकडे डोळे लावून बसले होते. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिल्यावर प्रत्येक जण भारत किमान ३०० धावा करेल असे छातीठोकपणे सांगत होते. प्रत्यक्ष सामना सुरू झाल्यावर भारताने त्याच दिशेने आगेकूच केली. शुभमन गिल लवकर बाद झाला तरी कर्णधार रोहित शर्मा आपल्या नेहमीच्याच स्फोटक अंदाजात फलंदाजी करत होता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने नेहमीसारखीच मोठी धावसंख्या फलकावर लावली. मात्र रोहित शर्मा बाद झाला आणि चित्र पालटायला सुरुवात झाली. रोहित बाद झाला, त्यापाठोपाठ श्रेयस अय्यर ही बाद झाला. लागोपाठच्या षटकात दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने विराट व राहुलवर दबाव आला. आणखी विकेट पडू नये यासाठी त्यांनी आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धावांचा वेग मंदावला.
ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिंसने गोलंदाजीत योग्य वेळी बदल केला. गोलंदाजांनीही भेदक गोलंदाज केली. त्यांना क्षेत्ररक्षकांनी योग्य साथ दिल्याने एका पाठोपाठ एक विकेट पडत राहिल्या आणि भारतीय संघ २४० वरच अडखळला. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ही धावसंख्या कमीच होती. मात्र भारतीय गोलंदाज फॉर्मात असल्याने या धावसंख्येचाही बचाव करतील, अशी आशा क्रिकेट प्रेमींना होती. मात्र पहिले तीन विकेट पडल्यावर हेड आणि लाबुशेन यांनी डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला आणि १४० कोटी जनतेचे १२ वर्षाचे स्वप्न भंगले. भारताच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने क्रिकेट प्रेमिंमध्ये निराशा पसरली. अर्थात खेळाडूंना ही खूप वाईट वाटले. खेळाडू मैदानावरच रडू लागले.
मैदाणाप्रमानेच घराघरात प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले. भारतीय संघ अंतिम फेरीत पराभूत झाला असला तरी संपूर्ण देश खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कारण तो दिवस आपला नव्हताच. प्रत्येक संघासाठी स्पर्धेत एक तरी दिवस वाईट येतोच त्या दिवशी संघाच्या बाजूने काहीच घडत नाही. भारताच्या दुर्दैवाने हा दिवस अंतिम फेरीत आला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अर्थात भारतीय खेळाडूंनी त्यांचे सर्वस्व पणाला लावले मात्र नशिबाने साथ दिली नाही. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने जेत्या प्रमाणे कामगिरी केली. अकरा पैकी दहा सामने जिंकून आपणच सर्वोत्तम असल्याचे दाखवून दिले. एका पराभवाने भारतीय संघाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. त्यांच्या या कामगिरीचा देशातील १४० कोटी जनतेला सार्थ अभिमान आहे. भारतीय संघाचे विश्व विजयाचे स्वप्न भंगले असेल तरी त्यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले नाहीत. भलेही यावेळी आपण विश्वविजय मिळवू शकलो नाही तर पुढील विश्वचषकात भारतीय संघ विश्वचषकावर देशाचे नाव कोरल यात शंका नाही.
Bad luck team India... Better luck next time...
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.