मंत्रोपचारात सद्गुरू नाना महाराजांच्या मूर्तीस महाभिषेक

    20-Nov-2023
Total Views |
  • सपाद जन्मशताब्दी समापन सोहळा उत्साहात
nana-maharaj-centenary-celebration - Abhijeet Bharat
 
नागपूर : त्रिपदी परिवारातर्फे दत्त संप्रदायातील परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे शिष्य चैतन्यानंद सरस्वती प.पू. श्री नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद जन्मशताब्दी समापन सोहळ्याचे द्विदिवसीय आयोजन करण्यात आले होते. यात रविवार, 19 रोजी सकाळी 8.30 वाजता श्रीसद्गुरू मूर्तीस महाभिषेक करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पालखी यात्रेने झाली. फुलांनी सजविलेल्या पालखीत नाना महाराजांची मूर्ती विराजमान होती. कार्यक्रम स्थळापर्यंत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. त्यावरून पालखी कार्यक्रमस्थळापर्यंत आली. यात भक्तांनी उत्साहात सहभाग घेतला.
 
पालखी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर नाना महाराजांच्या चांदीच्या मूर्तीला मंत्रोपचारात अभिषेक करण्यात आला. यानंतर मूर्तीला वस्त्र, हार, फुले अर्पण करण्यात आली. यानंतर विष्णुसहस्रनामाच्या उच्चारात सव्वा लक्ष बिल्वपत्र व सव्वा लक्ष तुळशीपत्र नाना महाराजांच्या मूर्तीला अर्पण करण्यात आले. यात सुरुवातीला सुवर्ण, चांदीचे बिल्वपत्र, मोती, पोवळे आदी रत्नही महाराजांच्या मूर्तीला अर्पण करण्यात आले. यानंतर बिल्वपत्र व तुळशीपत्र अर्पण करण्यात आले. यात उपस्थित सर्व भक्तानी सहभाग घेतला. यानंतर भक्तांनी अणलेल्या 125 पदार्थांचा महाराजांना नैवेद्य दाखविला गेला. यानंतर महाराजांची आरती करण्यात आली.
 
शांतीपुरुष सेवा संस्थेतर्फे आयोजित या पुस्तक विमोचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू. बाबामहाराज तराणेकर असून प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, तेजस तराणेकर, राजेंद्र बेनोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार प.पू. बाबामहाराजांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते राजेंद्र बेनोडेकर लिखित ‘मागोवा : प्राचीन भारताचा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात राजीव हिंगवे यांनी या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. यावेळी बोलताना डॉ. विलास डांगरे म्हणाले, यांनी प्रभू रामचंद्र, शबरी आणि मातंग ऋषींची कथा सांगितली. मातंग ऋषींच्या श्रमबिंदूंमुळे ही सुंदर बाग निर्माण झाली, असे शबरीने रामाला सांगितले. त्याचप्रमाणे आज शिष्यपरिवाराच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे, जगण्याची कला नाना महाराजांच्या मार्गदर्शनानुसार समाज व त्यांच्या अनुयायांनी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
कार्यक्रमात निखिल मुंडले, रवींद्र संगीतराव, श्याम काळे, शिरीष भगत, हेमंत काळोंखे, सचीन पळसोकर, निखिल टोंगळे, राजेंद्र भागवत, प्रकाशराव धुडे, अविनाश खेडकर, अतुल बरडे, अश्विन खरे, मीनल सांगोळे, मिलिंद वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्तम संचालन किशोर गलांडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन तेजस तराणेकर यांनी केले. महाप्रसादाने या भव्य समारोहाची सांगता झाली.
 
भाविकांमुळेच त्रिपदी परिवाराचा विस्तार
 
भक्तांमध्येच वासुदेवाचे दर्शन घडते, अशी नाना महाराजांची धारणा होती. त्यानुसार संपूर्ण आयोजन व उपक्रम भाविकांमुळे यशस्वी होतात. त्यातूनच त्रिपदी परिवाराचा विस्तार झाला असल्याचे मत प. पू. डॉ. बाबामहाराज तराणेकर यांनी आशीर्वचनादरम्यान व्यक्त केले. नानांच्या निर्वाणानंतर तराणेकर कुटुंबाला जे धन प्राप्त झाले ते लोकसंग्रहाचे आहे आणि उर्वरित श्रेय भाविकांचे आहे. याच कारणामुळे त्रिपदी परिवाराला आता एका भव्य छत्राचे स्वरूप आले असून त्याखाली येणार्‍या प्रत्येकाला त्याची सावली आणि कृपाप्रसाद मिळतो, असेही डॉ. तराणेकर यांनी सांगितले.