नवी दिल्ली :
IND vs AUS World Cup 2023 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी विश्वचषकाचा भारत विरुद्ध आस्ट्रेलिया अंतिम सामना रंगला. यावेळी ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे देखील अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट गमावत 241 धावा करत विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने 141 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तर मारांश लॅबुशेनने नाबाद 58 धावा केल्या. मिचेल मार्श 15 धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 51 धावा केल्या.
तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली.