वि. सा. संघात अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन

19 Nov 2023 14:29:15
  • वाचकांसाठी दिवाळी अंक वाचनाची पर्वणी
vidarbha-sahitya-sangh-study-room-inauguration - Abhijeet Bharat
 
नागपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे शनिवार, 18 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांकरिता एका अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. दिवाळीचे औचित्य साधून वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी फीत कापून याचे लोकार्पण केले. तसेच दिवाळी अंकांच्या ग्रंथप्रदर्शनाचे देखील यावेळी त्यांनी उद्घाटन केले.
 
वि. सा. संघातर्फे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचाच हा एक भाग आहे. विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करता यावा याकरिता हा अभ्यासिका कक्ष सर्व सोयींनी युक्त करण्यात आला आहे. या कक्षात विद्यार्थ्यांना सकाळी 8 ते रात्री 8 या वेळात अभ्यास करता येईल. त्यांचे आवश्यक सामान ठेवण्याकरिता येथे लॉकर्सची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क भरून या अभ्यासिकेचा उपयोग करता येणार आहे.
 
तसेच वाचकांना विविध दिवाळी अंकांच्या वाचनाचा आनंद घेता यावा याकरिता वि.सा. संघाच्या ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. याचेही आज अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात विविध वृत्तपत्रांच्या अंकांबरोबरच इतरही दिवाळी अंक आहेत. यावेळी पंचमीनिमित्त वि.सा.संघात लक्ष्मीपूजन देखील करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्षांसह सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. राजेंद्र डोळके, विकास लिमये, उल्हास केळकर, प्रदीप मुन्शी, विवेक अलोणी, नितीन सहस्रबुद्धे, डॉ. तीर्थराज कापगते, संयोगिता धनवटे, उदय पाटणकर, प्रदीप मोहिते आदींची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0