‘ॲडव्‍हांटेज विदर्भ’मध्‍ये मत्‍स्‍यपालन व्‍यवसायाला म‍िळणार प्रोत्‍साहन

19 Nov 2023 13:53:04
  • ‘एड’च्‍या बैठकीत झाली विविध विषयांवर चर्चा
advantage-vidarbha-industrial-summit-fisheries-business - Abhijeet Bharat 
नागपूर : समुद्र किंवा टाक्‍या, तलाव व इतर मानवनिर्मित पाणवठ्यांमधून प्राप्‍त झालेले मासे व जलीय प्राणी हे मानवाचे खाद्यान्‍न असून उत्‍पादनाअभावी शनिवारी मागणीच्‍या केवळ 10 टक्‍केच पुरवठा करणे शक्‍य होते. या व्‍यवसायाला उद्योगाचे स्‍वरूप देण्‍यासाठी ‘ॲडव्‍हांटेज विदर्भ - खासदार औद्योग‍िक महोत्‍सवामध्‍ये प्रोत्‍साहन देण्‍यात येणार आहे.
 
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) च्‍यावतीने येत्‍या जानेवारी 2023 मध्‍ये विविध क्षेत्रांतील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने ॲडव्‍हांटेड विदर्भ - खासदार औद्योगिक महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आकाराला आलेल्‍या या संघटनेने विदर्भातील सुमारे 48 विविध उद्योगांना संघटनेशी जोडले असून ॲडव्‍हांटेज विदर्भच्‍या तयारीसाठी विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींच्‍या बैठकी घेण्‍यात येत आहेत. त्याअंतर्गत शन‍िवारी महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्‍या सभागृहात फिशरीज ग्रुपची बैठक पार पडली.
 
एडचे सचिव डॉ. विजय शर्मा यांच्‍या अध्‍यक्षतेत झालेल्‍या या बैठकीला मत्‍स्यगंधा जलकृषक संस्‍थचे नथ्‍थू कामठे, अभियंते विक्रम देशमुख, परम मत्‍स्‍यबीज उत्‍पादन केंद्र विरखंडीचे संचालक व एडचे सहसंयोजक प्रभाकर मांढरे, नॅशनल फेडरेशन ऑफ फिशरीज कोऑपरेटीव्‍हचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष व एडचे संयोजक डॉ. प्रकाश मालगावे, विदर्भ विभागीय मत्‍स्‍य संघाचे माजी संचालक डॉ. उल्‍हास फडके, येनुगार फिशरीजचे राजीव येनुगार व एडचे विजय फडणवीस यांची उपस्‍थ‍िती होती.
 
ॲडव्‍हांटेज विदर्भमध्‍ये मत्‍स्‍यपालन क्षेत्रातील यशोगाधा, तज्‍ज्ञांच्‍या कार्यशाळा, परिषदांचे आयोजन केले जावे, अशा सूचना यावेळी व्‍यावसायिकांनी केल्‍या. उत्‍पादन, वितरण, मार्केटिंग व रेस्‍टॉरंट व हॉटेल उद्योगासाठी लागणारी उत्‍पादन असा एकात्म‍िक दृष्‍टीकोन ठेवून मत्‍स्‍यपालन व्‍यवसाय प्रदर्शित केला जावा, असे विक्रम देशमुख यांनी सांग‍ितले. सरकारने मत्‍स्‍यव्‍यवसायीकांच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी कायदा तयार करावा, असे डॉ. मालगावे यांनी सांगितले. डॉ. विजय शर्मा यांनी ॲडव्‍हांटेड विदर्भचा उद्देश सांगतानाच मत्‍स्यव्‍यवसायिकांच्‍या सर्व समस्‍या व मागण्‍या सरकारदरबारी पोहोचवण्‍यासाठी एड मदत करेल, असे आश्‍वासन डॉ. विजय शर्मा दिले.
Powered By Sangraha 9.0