मनपातर्फे आयोजित रक्तदान शिबिरला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

17 Nov 2023 17:15:05
- विविध आरोग्य केंद्रांमध्ये आयोजन
- एचडीएफसी बँक व अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य

blood donation camp organized by NMC 

नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने एचडीएफसी बँक आणि अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. शुक्रवारी खामला येथील मनपा डिस्पेंसरीमधील रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, माजी नगरसेविका पल्लवी शामकुळे, लक्ष्मीनगर झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे उपस्थित होते.
 
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या दहाही झोनमध्ये शहरातील विविध ठिकाणी ३० नोव्हेंबरपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आज शुक्रवारपासून रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला असून खामला येथील मनपा डिस्पेंसरी येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
१८ नोव्हेंबर रोजी स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र येथे, २० नोव्हेंबर रोजी कमाल चौक येथील पाचपावली स्त्री रुग्णालय येथे, २१ नोव्हेंबर रोजी चंद्रमणी नगर येथील नवकर बुद्ध विहार येथे, २२ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर येथे, २३ नोव्हेंबर रोजी लुंबीनी बुद्ध विहार पंचवटी नगर येथे, २४ नोव्हेंबर रोजी मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे, २८ नोव्हेंबर रोजी छावनी सदर येथे स्थित मनपा मंगळवारी झोन कार्यालयामध्ये, २९ नोव्हेंबर रोजी भवानी माता मंदिर परिसर पारडी येथे आणि ३० नोव्हेंबर रोजी नेहरूनगर झोन कार्यालय येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व रक्तदान शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील.
 
नागरिकांनी आपल्या नजीकच्या रक्तदान शिबिर स्थळी भेट देउन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0