नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद जन्मशताब्दी समापन सोहळा 18 नोव्हेंबरला

16 Nov 2023 18:21:43
  • सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्‍थ‍िती
  • द्विदिवसीय सोहळ्यानिमित्त धार्मिक व विविध कार्यक्रम
nanamaharaj-taranekar-centenary-celebration - Abhijeet Bharat
 
नागपूर : श्री शांतिपुरुष सेवा संस्थेतर्फे श्री दत्तसंप्रदायातील परमपमूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे शिष्य चैतन्यानंद सरस्वती नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद (125 वर्षे) जन्मशताब्दी समापन समारोह 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या द्विदिवसीय समारोहात धार्मिक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती श्री शांत‍िपुरुष सेवा संस्‍थेचे अध्‍यक्ष बाबामहाराज तराणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला संस्‍थेचे अध्‍यक्ष बाबामहाराज तराणेकर तसेच, राजीव हिंगवे व संस्‍थेचे सर्व विश्‍वस्‍त तेजस तराणेकर, तारक तराणेकर, चंद्रकांत गुंजीकर, संजय पाठक, प्रदीप सराफ यांची उपस्थित होती.
 
शनिवार, 18 रोजी रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सायंकाळी 4.30 वाजता होणार्‍या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नानामहाराजांच्या कार्याचा अविरतपणे विस्तार करणारे डॉ. बाबामहाराज तराणेकर राहणार आहे.
 
या कार्यक्रमात अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्‍या कार्याचा मागोवा घेणारी चित्रफित प्रदर्शित केली जाणार असून त्रिपदी परिवाराचे मुखपत्र ‘श्री शांत‍िपुरुष’ च्‍या रौप्‍य महोत्‍सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन व ‘चैतन्‍यपीठ’ या युट्यूब चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या बाबामहाराज तराणेकर यांच्‍या ‘आत्‍मसंवाद’ या प्रवचन मालेवर आधारित ग्रंथाचेदेखील प्रकाशन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते केले जाईल. रात्री 8 वाजता कार्तिक कला अकादमी इंदूरतर्फे ‘अमृतस्‍य नर्मदा’ ही नृत्‍यनाटिका प्रस्‍तुत केली जाणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील नामवंत व प्रसिद्ध संस्थांचे अध्यक्षपद भूषविणार्‍या, महिलांच्या उन्नतीकरिंता कायम सक्रिय असणार्‍या कांचन गडकरी यांचीही विशेष उपस्थिती राहील.
 
रविवार, 19 रोजी मूकबधिर संस्था, शंकरनगर चौक येथे सकाळी 8.30 वाजता श्रीसद्गुरूंच्या मूर्तीस महाभिषेक व मान्यवरांचे उद्बोधन होणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प.पू्. बाबामहाराज तराणेकर राहणार असून प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, सयाजी विद्यापीठ वडोदराच्‍या संस्‍कृत, पाली व प्राकृत भाषा विभागाच्‍या अध्‍यक्ष डॉ. श्‍वेता जेजुरीकर यांची उपस्‍थ‍िती राहणार आहे. यावेळी राजेंद्र बेनोडेकर लिखित ‘मागोवा: प्राचीन भारताचा’ पुस्‍तकाचे विमोचन होणार आहे. त्यानंतर, श्रीदर्शन सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
 
या दोन दिवसीय कार्यक्रमांना भारतभरातून नानामहाराज तराणेकर यांचे भक्‍त व त्रिपदी परिवाराचे सदस्‍य हजारोच्‍या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहणार आहे. नागपूरकरांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन श्री शांत‍िपुरुष सेवा संस्‍थेचे कार्यकारी अध्‍यक्ष राजीव हिंगवे यांनी केले आहे.
 
अ. भा. त्रिपदी परिवार विषयी...
 
दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्‍लभ नृसिंह सरस्वती- वासुनंद सरस्वती- दत्तावतार प.पु. नाना महाराज तराणेकर यांनी प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित करुणात्रिपदी या भक्तीप्रद प्रार्थनेचा सर्व हिंदुस्थानभर प्रसार केला. सामूहिक त्रिपदी प्रार्थनेचे जनक नाना महाराजांच्‍या उपस्थितीत व आशीर्वादाने त्‍यांचे नातू बाबा महाराज तराणेकर यांनी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराची 1992 साली स्थापना केली. यामाध्‍यमातून त्‍यांनी समाजप्रबोधनाचे कार्य करायला प्रारंभ केला. डॉ. बाबामहाराज तराणेकर हे वैदिक भूविज्ञान महर्षी असून ते अख‍िल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख आहेत. ते व्यासंगी संतसाहित्य संशोधक, लेखक व संपादक आहेत. गेली 26 वर्षे शांतीपुरुष, नागपूर तथा सर्वोत्तम, इंदौर या मासिकांचे संपादक म्हणून कार्य करीत आहेत.
 
अध्‍यात्‍मशास्‍त्राचा, वैदिक परंपरेचा दांडगा अभ्‍यास असलेल्‍या बाबामहाराज तराणेकर यांचे अनेक ठिकाणी त्‍या अनुषंगाने त्‍यांचे लेख प्रकाशित झाले असून प्रवचनमालिका संपन्‍न झाल्‍या आहेत. गुरुचरित्रावर त्रिदिवसीय प्रबोधनमालिका 12 वर्षे तसेच, गेल्‍या 9 वर्षांपासून भागवतावरदेखील ते प्रवचन करत आहेत. कोरोना काळात त्‍यांनी चैतन्यपीठ या युट्युब वाहिनीवर दर शनिवारी रात्री 8.30 वाजता जी प्रवचने (आत्मसंवाद) प्रसारित होत असतात, अशी 175 पुष्‍पांची प्रवचने आजपर्यंत झालेली आहेत. ती द़ृकश्राव्य स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मुंबई समाजभूषण, येवला येथे जीवनगौरव, पुणे येथे नानासाहेब पेशवे सन्मान, गाणगापूर येथे यतीपूजन सन्मान, शंकराचार्य सन्मान, श्रीक्षेत्र कारंजा येथे वासुदेव प्रबोधिनी सन्मान, शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते षष्ट्यब्दीपूर्ती सन्मान प्राप्‍त झालेले बाबा महाराज तराणेकर सर्व हिंदुस्थानात परदेशी त्रिपदी परिवाराच्या विविध शाखांमधून निरनिराळे समाजोपयोगी ३५ प्रकल्प ते चालवतात.
Powered By Sangraha 9.0