पीयूष गोयल यांनी फ्रेमोंट येथील टेस्ला कारखान्याला दिली भेट

15 Nov 2023 15:53:06
  • सॅन फ्रान्सिस्को दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांच्या गोलमेज बैठकीत झाले सहभागी
piyush-goyal-visits-tesla-factory-san-francisco-discusses-india-us-economic-ties - Abhijeet Bharat
 
सॅन फ्रान्सिस्को : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल 13 नोव्हेंबर 2023 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे दाखल झाले. अधिकृत दौऱ्याला सुरुवात करत वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी फ्रेमोंटमधील टेस्ला कारखान्याला भेट दिली आणि टेस्ला समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
 
त्यानंतर गोयल यांनी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी राजदूत कॅथरीन ताई, कोरियाचे व्यापार मंत्री दुकगेन आन आणि सिंगापूरचे व्यापार आणि उद्योग मंत्री गॅन किम योंग यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या.
 
या मंत्रिस्तरीय बैठकांदरम्यान, वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी हिंद-प्रशांत आर्थिक आराखडा (IPEF) अंतर्गत संभाव्य सहकार्य, द्विपक्षीय व्यापार आणि वाणिज्य संबंध वृद्धिंगत करण्याचे मार्ग आणि साधने, जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित बाबी आणि परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांच्या सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या संवादादरम्यान, गोयल यांनी अनुक्रमे एआयटीआयजीए आणि सीईपीएच्या आढाव्याचे जलद गतीने निष्कर्ष काढण्याची सूचना केली.
 
तसेच, यूएसआयएसपीएफ आणि इंडियास्पोरा यांच्या सहकार्याने आयोजित गुंतवणूकदारांच्या गोलमेज बैठकीमध्ये ते सहभागी झाले. या बैठकीला ऊर्जा, निर्मिती, लॉजिस्टिक, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांसह अमेरिकेतील विविध उद्योगांमधील भांडवलदार आणि उद्योजक उपस्थित होते. एका संवादात्मक सत्रात, गोयल यांनी सहभागींसोबत व्यापक चर्चा केली आणि भारतात व्यवसाय सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना अधोरेखित केल्या.
 
या दौऱ्यात वाणिज्य आणि उद्योग मंत्री तिसऱ्या आयपीईएफ मंत्रिस्तरीय बैठक आणि आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य बैठकीत सहभागी होतील. उभय राष्ट्रांमधील भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि व्यापार आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी या दौऱ्यात ते प्रसिद्ध व्यावसायिक, अमेरिकेचे अधिकारी आणि उद्योजकांशी संवाद साधतील.
Powered By Sangraha 9.0