Children's Day 2023 : आजचे बालक हेच देशाचे भविष्य

14 Nov 2023 14:18:21
 
childrens-day-2023-celebrating-the-future-of-india - Abhijeet Bharat
 
आज १४ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक जागतिक पातळीवर २० नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पाहिल्यांदाच बालदिन साजरा करण्यात आला. सर्व देशांनी लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्माबाबतचे सामंजस्य वाढवणे तसेच जगभरातील मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना मान्य करून त्यादृष्टीने काम करावे हा त्या मागचा हेतू. २० नोव्हेंबर हीच तारीख निवडण्याचे कारण असे की १९५९ मध्ये याच तारखेस संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने बाल हक्कांची सनद स्वीकारली. शिवाय १९८९ मध्ये याच दिवशी बाल हक्कांच्या मसुद्यावर सह्या झाल्या. हे हक्क आतापर्यंत १९१ देशांनी मान्य केले.
 
भारतात मात्र १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. कारण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा हा जन्मदिवस. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडायची. ते सतत लहान मुलांच्या गराड्यात असायचे. लहानमुले हेच देशाचे भविष्य आहे. आजचा बालक उद्याचा नागरिक आहे. तो नेहमी आनंदी, उत्साही आणि सुरक्षित असायला हवा. देशातील लहान मुले सुरक्षित तर देश सुरक्षित असे ते नेहमी म्हणत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते.
 
पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित नेहरूंना बालकांविषयी वाटणाऱ्या प्रेमाची आठवण म्हणून हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. शिवाय पंडित जवाहरलाल नेहरूंना मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा देखील हा एक मार्ग आहे. बालकांनाही आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे. आजचे बालक हेच देशाचे भविष्य आहे. या बालकांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित तसेच मनाने आणि शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहेत. हा हक्क मिळालेल्या नशीबवान बालकांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याची जाणीव ठेवली पाहिजे. पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांमध्ये रुजवली तर भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतील त्यामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. बालदिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे. देशातील सर्व मुलामुलींना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0