जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक आयोगाच्या 33 व्या परिषदेचे भारत यजमानपद भूषवणार

13 Nov 2023 14:01:03
  • केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला या परिषदेचे उद्घाटन करणार
global-animal-health-regional-council-meeting-india - Abhijeet Bharat
 
नवी दिल्ली : नवी दिल्लीत 13 ते 16 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक आयोगाच्या 33 व्या परिषदेचं यजमानपद भूषवण्यासाठी भारत सज्ज आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला या परिषदेचे उद्घाटन आणि समारोप करतील. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉक्टर संजीव बालयान आणि डॉक्टर एल मुरुगन हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
 
मे 2023 मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या 90 व्या सर्वसाधारण सत्रात या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी निर्णय घेण्यात आला. नवी दिल्लीत हॉटेल ताजमहाल येथे ही परिषद आयोजित केली जाणार आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग या कार्यक्रमाचे आयोजन करणार असून भारतासह 36 सदस्य देशांची शिष्टमंडळे यांच्यासह या क्षेत्रातल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे वरिष्ठ अधिकारी आणि खासगी क्षेत्र आणि खासंगी पशुवैद्यक संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
 
कोविड-19 साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या आव्हानानंतर मानव-प्राणी-पर्यावरण परस्पर संबंधांमधील जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी वैज्ञानिक कौशल्याधारित भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. भविष्यातील आव्हानांसाठी पशुवैद्यकीय सेवांमध्ये लवचिकता आणि क्षमता वाढवण्याची गरज देखील यामुळे अधोरेखित होत आहे. यासारख्या प्रत्यक्ष स्वरुपात होणाऱ्या प्रादेशिक परिषदांमुळे निकट संपर्क, सक्रिय संवाद तसेच शिष्टमंडळे, निमंत्रित तज्ञ आणि प्रमुख प्रादेशिक भागीदार यांच्यात अर्थपूर्ण चर्चा सुलभ होतात. मौल्यवान चर्चांना चालना देणारा आणि आवश्यक परस्परपूरक संबंध निर्माण करण्याचा हा एक आठवडा ठरेल अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0