(Image Source : Internet)
नागपूर :
दीपावली (Diwali 2023) या संस्कृत शब्दाचा अर्थ दीपाची आवली म्हणजेच दिव्यांचा रंग असा होतो. आनंदाच्या या दीप उत्सवात फराळामध्ये चकली, चिवडा, लाडू बनवले जातात. यातही लहान मुलांचे विशेष आकर्षण म्हणजे फटाके. सुंदर स्वच्छ नवीन कपडे घालून सर्व कुटुंबीय तयार होऊन एकत्र येतात. भारतीय उत्सवांची खरी मजा म्हणजे संपूर्ण कुटुंबीय एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने ते साजरे करतात. पण मात्र दिवाळीच्या सणाचे महत्व काय आहे? हा उत्सव साजरा करण्यामागे काय पारंपरिक कथा असावी? चला तर जाणून घेऊ या दिवाळीचे महत्व काय आहे.
अशी आहे दिवाळीची कथा
श्रीराम भगवान हे विष्णूचा सातवा अवतार आहे. त्रेतायुगात, श्री रामाने अश्विन, शुक्ल पक्षच्या दशमीला लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. म्हणून हा दिवस दसरा किंवा विजया दशमी म्हणून साजरा केला जातो आणि दैत्यराजावर विजय मिळवल्यानंतर श्रीरामांना त्यांच्या राज्यात अयोध्येत परतण्यासाठी सुमारे २० दिवस लागले होते.
दरम्यान, अयोध्येतील लोक श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांचे स्वागत करण्यासाठी फार आतुर होते. म्हणून आपले प्रेम, भक्ती आणि आनंद दर्शवण्यासाठी अयोध्येच्या जनतेने संपूर्ण नगराला मातीच्या दिव्यांनी सजविले असल्याचे सांगितले जाते. तो अमावस्येचा दिवस असल्याने आकाशात चंद्र नव्हता. म्हणून चंद्राच्या अनुपस्थितीमध्ये या मातीच्या दिव्यांनी संपूर्ण अयोध्या नगरीला प्रकाशाने भरून दिले होते.
दिवलीच्या पाच दिवसांचे महत्व
पारंपारिक पद्धतीने दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली थोर संस्कृती सुद्धा सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करायला शिकवणारी आहे. म्हणूनच दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारस या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. या दिवशी महिला उपवास करतात आणि संध्याकाळी भाजी, भाकरी आणि गूळ असा नैवेद्य दाखवून गाय आणि वासराची पूजा करून उपवास सोडतात. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग, शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची केलेली ही कृतज्ञता पूजा असते. तसेच आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि घरात सौख्य नांदावे, घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने देखील गाय वासराची पूजा केली जाते. या दिवसापासून घर-अंगणात दिवे लावण्यास सुरुवात होते.
दुसरा दिवस असतो धनत्रयोदशीचा. कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद याला देखील मोठे महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी, गणेश, कुबेर, धन्वंतरी आणि एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानतात. या दिवशी सोने, चांदी, नवे कपडे, भांडे, चणे, लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, खेळणी, लाह्या, बत्ताशे इत्यादी विकत घेतले जाते.
तिसऱ्या दिवशी आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी नरकचतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्त्व आहे. या दिवशी सुवासिक तेल लावून उटण्याने स्नान करतात. यमासाठी दीपदान करतात. या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करतात आणि घरातील पुरुष मंडळींना स्नान करताना दिव्याने ओवाळतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रित्यर्थ नरकचतुर्दशी साजरी केली जाते.
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा. आश्विन अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजन पश केली जाते. या दिवशी लक्ष्मी देवी सर्वीकडे संचारते. स्वच्छ, योग्य असे स्थळ ती आपल्या वास्तव्यास शोधते. या दिवशी रात्री श्री गणेश, लक्ष्मी देवी आणि देवी सरस्वतीची पूजा करतात. अष्टदल कमळ किंवा स्वस्तिकावर लक्ष्मी स्थापित करून देवीची पूजा करतात. पंचामृत, लाह्या- बत्ताशे, चणे-गूळ, अनारसे, फळे यांचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी नाणी, सोने, चांदीची पूजा देखील करतात. व्यावसायिक किंवा व्यापारी आपल्या दुकानाची पूजा करतात.
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा असते. या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे. बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तिन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचे राज्य अजूनही यावे यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात 'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो' अशी म्हण रूढ आहे.
दिवाळीची सांगता भाऊबीजेच्या सणाने होते. हा सण खास भाऊ -बहिणीचा असतो. कार्तिक शुद्ध द्वितीय ज्याला यमद्वितीया असे म्हणतात, या दिवशी बहिणी भावाला ओवाळून भेटवस्तू देते. आधीच चंद्राला ओवाळल्यानंतर बहीण भावाला ओवाळते. भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. याप्रसंगी बहीण आपला भाऊ चिरंजीव व्हावा आणि त्याची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी.