- नयनरम्य पालखी सोहळ्यात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ' नामाचा गाजर
नागपूर : दत्त संप्रदायात औदुंबर प्रदक्षिणेला विशेष महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या निजानंदगमन दिनाच्या पुण्यपर्वावर जयप्रकाशनगर येथील गुरुमंदिरात आज अखंड औदुंबर प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजिण्यात आला.
श्री गुरुद्वादशीच्या पुण्यपर्वावर आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6.20 वाजता सामूहिक संकल्पोच्चाराने झाली. सकाळी 6.23 पासून सायंकाळी 5.23 पर्यंत औदुंबराला अखंड प्रदक्षिणा घालण्यात आली. पहिली प्रदक्षिणा सद्गुरूदास महाराज, अजेय देशमुख आणि रसिका देशमुख यांनी घालून अखंड प्रदक्षिणेला सुरवात केली. त्या नंतर दिवसभर हजारो भक्तांनी प्रदक्षिणा सोहळ्यात सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी 5.45 ते 7.30 पर्यंत श्रींची पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली.
यावेळी सद्गुरुदास महाराज आणि भक्तांनी दत्त संप्रदायतील प्रदक्षिणा पद आणि 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ' नामाचा सामूहिक गजर केल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याचे बघायला मिळाले. संपूर्ण पालखी सोहळा थाटात पार पडला. नागपूरच्या विविध भागांसह लगतच्या गावांमधून देखील मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली. आरतीनंतर महाप्रसादाने प्रदक्षिणा सोहळ्याची सांगता झाली.