बचत गटाच्या महिलांनी साजरी केली ‘जल दिवाळी’

10 Nov 2023 15:27:19

women of bachat group celebrated jal diwali
 
 
नागपूर :
केंद्र शासनाच्या आवासन व शहरी कार्य मंत्रालय, AMRUT 2.0 अंतर्गत 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 'जल दिवाळी' उपक्रम साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) व AMRUT 2.0 यांच्या कृतिसंगमातून ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान’ च्या माध्यमातून 9 नोव्हेंबर 2023 रोजी 'जल दिवाळी' हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमाच्या माध्यमातून DAY-NULM अभियाना अंतर्गत स्थापित बचत गटांच्या महिलांसाठी पेंच 1,2,3,4 अशा चार जलशुद्धीकरण केंद्र (Water Treatnebt Plant) येथे भेट घडवून आणण्यात आली. याप्रसंगी पेंच धरणातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कसे येते, त्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध कसे केले जाते, पाणी वाटपाची यंत्रणा कशी काम करते, या केंद्राची पाणी शुद्ध करण्याची क्षमता किती आहे याबाबतची माहिती शहरातील बचत गटाच्या महिलांना देण्यात आली. जलशुद्धीकरण केंद्राला भेट देणाऱ्या महिलांनाभेट वस्तू देण्यात आल्या.
शहराची वेळोवेळी हद्दवाढ व वाढती लोकसंख्या त्यामुळे शहराच्या सर्व भागात शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आव्हान महानगरपालिकेपुढे असते. परंतु, ही प्रक्रिया कशी केली जाते याची माहिती सामान्य नागरिकांना नसते. त्यामुळे सदर उपक्रम राबविण्यात आला तसेच शुद्ध व निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याच्या प्रक्रियेबाबत महिलांना शिक्षित करणे, स्वच्छ पाणी पुरवठ्याच्या प्रक्रियेची माहिती देणे, पाणी पुरवठ्याच्या सुविधेबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची जाणीव वाढविणे व पाणी पुरवठा विभागाच्या आगामी योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न हा ‘जल दिवाळी’ उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, मनपा, अति. आयुक्त (सामान्य) डॉ. सुनिल लहाने, मा. उपायुक्त (समाज विकास विभाग) विशाल वाघ, समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, महानगरपालिका सचिव प्रफुल्ल फरकसे, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर, प्रमोद भस्मे, सहा. अधिक्षक (समाज विकास विभाग) सुरेंन्द्र सरदारे, DAY-NULM अंतर्गत कार्यरत शहर अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व समुदाय संघटक यांनी उपरोक्त ‘जल दिवाळी’ कार्यक्रम घेण्याकरिता अथक परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0