Dhanteras 2023 : केवळ धनच नव्हे तर आरोग्याशीही संबंधित आहे धनत्रयोदशी

10 Nov 2023 11:45:50

dhanteras
(Image Source : Internet)
 
नागपूर :
Dhanteras 2023 : दिवाळी म्हणजे भारतातील सर्वात मोठा सण. देशात सर्व सणांमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहाने, आनंदाने, हर्षोल्हासाने साजरी केली जाते. दिवाळी या पाच दिवसीय सणाची सुरुवात धनतेरस किंवा धनत्रयोदशीने होते. धन या संस्कृत शब्दाचा अर्थ संपत्ती असा होतो, तर त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस. देशाच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्याच्या पद्धती जरी भिन्न असल्या तरी त्यामागचा उत्साह मात्र सारखाच असतो.
 
भारतात प्रत्येक सणामागे काही मान्यता असतात, त्याच्या प्रसिद्ध पौराणिक कथा असतात. धनत्रयोदशीला देखील अनेक पौराणिक घटनांशी जोडले जाते. असे म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी देवता आणि असुरांनी एकत्र येऊन अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते. इंद्र देवाला एकदा ऋषी दुर्वासाने श्राप दिला होता - 'तुझ्या डोक्यात संपत्तीचा गर्व शिरला आहे म्हणून लक्ष्मीला या जगातून लुप्त व्हावे लागेल.' दुर्वासाच्या श्रापामुळे लक्ष्मीने स्वतःला संपूर्ण जगातून लुप्त केले. लक्ष्मी ही शक्ती, शौर्य, उत्साह आणि तेजाची देवी असल्याने त्यांच्या लुप्त झाल्याने इंद्राची दशा दयनीय झाली. या संधीची वाट पाहत असलेल्या राक्षसांनी स्वर्गावर आक्रमण करून इंद्राचा पराभव केला आणि इंद्राने आपले राज्य गमावले.

dhanteras 
 
आता देवी लक्ष्मीला पुन्हा परत आणणे, हा यावरचा एकच उपाय होता. त्यासाठी देवतांना समुद्र मंथन करावे लागणार होते. हे थोडे अवघड काम होते. यासाठी देवतांनी असुरांशी मैत्री केली. त्यांना अमृताची लालसा देऊन समुद्र मंथनासाठी त्यांचे सहकार्य मिळवले. मंदार पर्वताच्या साहाय्याने देवतांनी समुद्र मंथन करण्याचे ठरविले. समुद्र मंथनासाठी दोरी म्हणून नागराज वासुकीचा उपयोग केला. अशा पद्धतीने समुद्राचे मंथन करून त्यातून निघालेल्या लक्ष्मी आणि अमृताच्या मदतीने देवतांनी असुरांचा पराभव केला आणि इंद्र देवाने आपले अधिपत्य पुन्हा स्थापित केले.
 
याच समुद्र मंथनादरम्यान निसर्गोपचार चिकित्सक भगवान धन्वंतरी सुद्धा देवतांना मिळाले, असे म्हटले जाते. प्राचीन ग्रंथानुसार, धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अवतार आहे, असे म्हणतात. प्राचीन काळापासूनच स्वछता आणि आरोग्याचा विचार केला जात असल्याने दिवाळीपूर्वी संपूर्ण घराची साफसफाई करण्याची प्रथा सुरु झाली असावी. म्हणजेच निरोगी आणि स्वच्छ राहण्याची परंपरा आपल्या भारतात खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे.
 
परंपरेनुसार, संध्याकाळच्या वेळी यमाला दिवे दान केले जाते आणि हे करत असताना भगवान धन्वंतरीचे स्मरण केले जाते. असे केल्याने रोगामुळे अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळते, असे म्हणतात. धनत्रयोदशी हा आरोग्याचा देखील सण आहे आणि याच्या मागे आयुर्वेदाचे रहस्य दडलेले आहे, याबाबी बहुतांश लोकांना माहिती नसावी.

 
 
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी.
Powered By Sangraha 9.0