(Image Source : Internet/ Representative)
आज 9 ऑक्टोबर 2023 वर्ल्ड पोस्ट डे (World Postal Day) अर्थात जागतिक टपाल दिन. दरवर्षी 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल सेवा दिवस (जागतिक टपाल दिवस किंवा जागतिक डाक दिवस) साजरा केला जातो. टेलिफोन आणि मोबाईल अस्तित्वात येण्याच्या आधीपासून टपाल सेवा अस्तित्वात आहे. टपाल सेवेला मोठा इतिहास आहे.
राजे, राजघराणी, राजांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सामान्य नागरिक पत्रांद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायचे. आधी प्रत्येक गावात एक शिपाई असायचा. हा शिपाई गावातील पत्र घेऊन पुढच्या गावातल्या शिपायाला द्यायचा. प्रत्येक शिपाई त्याच्याकडे आलेल्या पत्रातील जी पुढे पाठवायची ती वेगळ्या पिशवीत भरून पुढच्या गावाला द्यायचा आणि जी स्वतःच्या गावातील आहेत ती पत्र स्वतःकडे ठेवून नंतर संबंधित ठिकाणी जाऊन वाटप करायचा. पुढे या व्यवस्थेत पिनकोड क्रमांकांचा समावेश झाला. यामुळे पत्त्यांची अचूकता वाढली आणि टपाल सेवा अधिक प्रभावीरित्या कार्यरत झाली.
ब्रिटिश काळापासून चालत आलेले टपाल खाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोचलेले आहे. आजच्या एसएमएस, वॉट्सॲप, ई-मेलच्या जमान्यातही टपाल यंत्रणा अन् पोस्टमनकाका आजही लोकांच्या मनात पाय रोवून उभे आहेत. टपाल खात्याची नियमितता, अचूकता, कार्यप्रणाली ही बिनचूक व विश्वासार्ह आहे, यात लोकांच्या मनात कोणतीच शंका नाही. पोस्टमन उन पावसाची तमा न बाळगता आपल्याला आपल्या प्रियजनांनी पाठवलेले साधं पत्र असो वा स्पीड पोस्ट वा रजिस्टर पार्सल असो पण प्रत्येकाच्या घरात प्रामाणिकपणे पोहोचवणारा हक्काचा जिव्हाळ्याचा माणूस म्हणजे पोस्टमन असतो.
देशात 1 एप्रिल 1854 रोजी टपाल सेवेला सुरुवात झाली. तेव्हापासून देशाच्या कानाकोपऱ्यात संदेशाचे वहन करण्यात टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्मार्ट मोबाईल, इंटरनेट अशा वेगवान संदेशवहनाच्या काळात टपाल खात्याने महत्त्व टिकवून ठेवले आहे. टपाल विभागाने देखील आपल्या सेवेत अमूलाग्र बदल केला असून, पद्धतीदेखील बदलल्या आहेत.
कोविड 19 या जागतिक आरोग्य संकटाच्या काळात पोस्ट विभागाने देखील महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आता इंटरनेटचा जमाना आहे. त्यामुळे पत्र व्यवहार, तार या सेवा मागे पडल्या आहेत. मात्र आजही जगभरात वस्तू पाठवण्यासाठी टपाल सेवा, पोस्ट ऑफिस काम करत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अवघं जग ठप्प पडलं होतं तेव्हा अनेक गोष्टी जगभरात सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी टपाल विभाग काम करत होते. यामध्ये औषधांपासून ते अत्यावश्यक वस्तू पर्यंत पार्सल पोस्टाने नागरिकांना पर्यंत पोहचविले आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये 9 ऑक्टोबर 1874 रोजी 22 देशांनी एका करारावर स्वाक्षरी (सही) केली आणि युनिव्हर्सल पोस्टल युनियन स्थापन झाली. ही अधिकृत आंतरराष्ट्रीय टपाल सेवेची सुरुवात होती. करारात सहभागी झालेल्या देशांनी आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहारासाठी विशिष्ट नियमांची चौकट निश्चित केली. यानंतर 1969 मध्ये जपानची राजधानी टोकियो येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची परिषद झाली. याच परिषदेत दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला.
घरात कोणाचा जन्म असो, मरण असो, नोकरीची ऑर्डर, मनिऑर्डर असेल किंवा दिवाळी निमित्ताने मिळणारे आप्त स्वकीयांचे शुभेच्छा पत्र असो अश्या किती तरी आठवणी वर्षानुवर्षे सामान्य माणसाचे पोस्टाशी नाते घट्ट करते. शेवटी पु ल देशपांडे यांचे 'माझे पौष्टिक जीवन’ या मधील काही ओळी आठवतात.
‘माझे पौष्टिक जीवन’मध्ये पु.ल.देशपांडे लिहितात -
“पोस्टाचं देवासारखं आहे. पोस्टमन देईल ते आपण निमूटपणे घ्यावं. देणारा तो, घेणारे आपण. शेवटी काय हो, आपण फक्त पत्त्यातल्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच असतो.”
प्रणव सातोकर, नागपूर
9561442605
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.