(Image Source : Internet/ Representative)
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संदेश माध्यमांचे स्वरूपही (Changing Postal Service) बदलले आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने काही मिनिटांमध्ये एका ठिकाणावरून थेट साता समुद्रापार परदेशातही सहजपणे संपर्क साधता येतो. अशा तंत्रज्ञानाने संपन्न असणाऱ्या युगात टपाल पत्राला लोक विसरत चालले आहे. टपाल म्हटले की, आजही डोळ्यापुढे चित्र उभे होते ते खांद्यावर पिशवी घेऊन असलेला पोस्टमॅन काका आणि लाल रंगाचा डब्याचा, सर्वांना टपालच्या माध्यमातून पत्र, त्यांच्या वस्तू, मनी ऑर्डर घेऊन येणारा पोस्टमॅन आता आधुनिक युगात डिजिटल होत चालला आहे. काळानुरूप टपाल सेवा पदोपदी बदलत चालली आहे. टपाल सेवेतही आता आधुनिक संसाधनाचा बोलबाला दिसून येत आहे. आज जागतिक टपाल दिनानिमित्त याच टपाल सेवेवर एक नजर टाकूया...
जगात सर्वाधिक पोस्ट ऑफिसेस भारतात आहेत. सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात १६८८ साली टपाल व्यवस्थेचा पाया मुंबई आणि मद्रास येथे रोवला गेला. त्याकाळी केवळ कंपनीच्याच टपालाची ये-जा टपालच्या माध्यमातून होत होती. वॉर्न हेस्टिंग्ज बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना १७७४ साली टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. त्यावेळी पोस्टमास्टर जनरलच्या पदाची नेमकी सुरुवात झाली. टपालसेवेत पैसे भरल्याचा पुरावा म्हणून तिकिटाऐवजी धातूचे टोकन टपालासोबत वापरले जात असे. टपालसेवा संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी अडचणी येऊ नये म्हणून १८३७ मध्ये पहिला भारतीय टपाल कायदा अस्तित्वात आणण्यात आला. कायद्यात नंतर अनेक बदलदेखील करण्यात आले. १ ऑक्टोबर १८५४ पासून टपाल तिकीट अस्तित्वात आले. कालांतराने तार व पोस्टल इंडेक्स नंबर कोड अर्थात पिन कोड ही संकल्पना उदयास आली. तेव्हापासून आजपर्यंत टपाल सेवा देशातील तळागाळातल्या जनतेला आपली अविरत सेवा देत आहे. आधुनिक काळात दळणवळणाच्या व्यापक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून १८७४ साली स्वित्झर्लंड येथील बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची (युपीयू) स्थापना करण्यात आली. त्यानुसार १९६९ साली जपानची राजधानी टोकिओ येथे भरलेल्या बैठकीत ९ ऑक्टोबर हा दिन ‘जागतिक टपाल दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. हा तर झाला इतिहास. पण आज लोक पारंपरिक पत्राचाराला विसरत चालले आहे. आधीच्या टपाल विभागात ७० ते ८० टक्के काम व्यक्तिगत पत्रावर चालायचे ते आता ३० ते ४० टक्यांवर आले आहे. यामुळे आजच्या जगात पत्रलेखनाची पद्धत लुप्त होत चालली असल्याचे जाणवत आहे.
पूर्वी पत्राच्या माध्यमातून मनातील भावना, प्रेम, आदर, सांत्वना व्यक्त केल्या जात असत. पत्रातून दोन व्यक्तींमध्ये एक भावनात्मक नाते निर्माण होत असे. एकमेकांबद्दल आपुलकी वाढत असे. एखादी आनंदाची बातमी दूरच्या नातेवाईकाला कळावी, त्यालाही आपल्या आनंदात सहभागी करून घेता यावे आणि दु:खात सांत्वना देता यावी, याकरिता पत्र लिहिले जाई किंवा तार पाठविली जात असे. पोस्टमॅन काका पत्र घेऊन आले की, आदरातिथ्याने त्याला पाणी विचारले जायचे. त्यांच्याकडून पत्र मिळाल्यास संपूर्ण कुटूंब एकत्रित येऊन ते मोठ्या उत्साहाने वाचत असे. आता एकत्र कुटूंब पद्धती सहसा दिसत नाही. कुटुंंबातील व्यक्ती वेगवेगळ्या राहतात. यामुळे एकत्रित येऊन पत्र वाचण्याची मजा कुठे तरी हरविली आहे. पत्र घेऊन आलेल्या पोस्टमॅनचे ना आदराने स्वागत होते ना त्याला अतिथीप्रमाने वागणूक दिली जाते. पूर्वी अशिक्षित व्यक्तींकरिता तर पोस्टमॅन हा कलेक्टरपेक्षा कमी नव्हता, पत्रातील मजकूर बिनचूकपणे पोस्टमॅन नातेवाईकांना वाचून दाखवायचा, गरजवंतांची पत्रेही लिहून द्यायचा. तसेच लपूनछपून लिहिल्या जाणाèया प्रेमपत्रांमुळे किती लग्नं जमली असावीत, हे सांगता येणार नाही. त्यातही त्याचा वाटा असायचा. परंतु, आता ही पद्धत बंद होत आहे.
आजच्या युवकांचे भावना व्यक्त करण्याचे माध्यम बदलले आहे. पत्राची जागा आता आधुनिक इलेक्ट्रॉनिक मेलने, एसएमएस, मेसेंजर, व्हॉट्सअॅपने घेतली आहे. स्मार्ट फोनमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असल्याने पत्र लिहिण्याची कला लुप्त होत चालली आहे. पत्र आणि मायना आता केवळ शैक्षणिक पाठ्य पुस्तकांपुरताच उरला आहे. टपालात देखील अनौपचारिक पत्रांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. असो, पण काळानुरूप टपालही स्मार्ट होत चालले आहे. भारतीय टपाल विभागाने स्वत:ला पारंपरिक पत्रव्यवहारापुरते सीमित न ठेवता, विविध क्षेत्रात पदार्पण केले आहे. यात बँक, ई-कॉमर्स सारख्या क्षेत्राचा उल्लेख आवर्जून करणे गरजेचे आहे. देशातील जवळपास १ लाख ५५ हजार टपाल कार्यालये अतिशय दुर्गम भागातही आपली सेवा देत आहेत. त्यामुळे टपाल बँक, एटीएम आणि इतर योजनांचा फायदा थेट तळागळातील लोकांपर्यंत पोहोचला आहे. टपालच्या ई- कॉमर्स पोर्टलमुळे विक्रेता आणि ग्राहक या दोघांना एक व्यासपीठ मिळाले आहे.
प्रवीण वानखेडे
९८२२२२८६३०
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.