नागपूर : आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 ला मराठी रंगभूमीवर पहिल्या मराठी नाटकाने सुरुवात केली होती. तो दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. नागपुरातली नवोदित कलावंतांची अग्रगण्य संस्था संजय भाकरे फाउंडेशनच्यावतीने रविवार, 5 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 5.30 वाजता पूर्व समर्थ नगर सांस्कृतिक भवन वर्धा रोड येथे त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. पराग घोंगे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रकाश एदलाबादकर उपस्थित राहतील. त्यानंतर नरेंद्र इंगळे लिखित विनोदी कथेचे शेखर मंगळमूर्ती यांनी केलेले नाट्यरूपांत 'वाऱ्यावर वरात' चा मुहूर्त होणार आहे. सर्व नाट्य रसिक, कलावंतांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते आणि संस्थेचे प्रमुख संजय भाकरे यांनी केले आहे.