‘गणू - गण गण गणात बोते' चा सर्वांग सुंदर प्रयोग

28 Oct 2023 14:08:48
  • प्रेक्षकांच्या मनात फुटला श्रध्देचा पाझर
  • नाट्य, नृत्य, संगीत, दृश्याने रसिक मंत्रमुग्ध
gajanan-maharaj-bhakti-natya-live-performance - Abhijeet Bharat
 
नागपूर : दुष्काळातही विहिरीला पाणी पाहिजे असेल तर मनात श्रध्देचा पाझर फुटला पाहिजे, असा संदेश देणाऱ्या श्री गजानन महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग दृश्य गीत, संगीत, नृत्याच्या माध्यमातून साक्षात अनुभवताना रसिक श्रोत्यांच्या मनात भक्तीचा पाझर फुटला. निमित्त होते ‘गणू - गण गण गणात बोते' या नाटकाचे. स्व. सचिन सराफ मेमोरियल ट्रस्टनिर्मित श्री गजानन महाराजांच्‍या आयुष्‍यातील प्रसंगाचे नाट्य रुपांतर असलेले भक्तिनाट्य ‘गणू - गण गण गणात बोते ' चा सर्वांग सुंदर प्रयोग बुधवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. श्री गजानन भक्‍तांनी सभागृह खचाखच भरून गेले होते.
 
श्री गजानन महाराज प्रेक्षकांमधून चाललेल्या दिंडीतून अवतरताच सभागृहात गजानन महाराज की जय चा जयघोष झाला. काडीने चिलीम पेटवणे, कोरड्या विहिरीला पाणी लागणे आदीं चमत्कारिक प्रसंग प्रत्यक्ष मंचावर बघून प्रेक्षक थक्क झाले. एलएडी स्क्रीनवरील दृश्य आणि नाटकातील प्रसंग यांचा सुरेख मेळ साधत कलाकारांनी अतिशय तयारीने श्री गजानन महाराजांचे जीवनकार्य प्रेक्षकांसमोर जिवंत केले.
 
या नाटकाची निर्मिती अनघा सराफ व वृंदा सराफ यांची होती तर लेखक व दिग्दर्शक देवेंद्र बेलणकर होते. संयोजिका व सहदिग्दर्शक रुपाली कोंडेवार-मोरे या होत्‍या. गजानन महाराजांची भूमिका डॉ. पीयूष वानखेडे यांनी अतिशय ताकदीने सादर करून रसिकांना महाराजांच्या दर्शनाची प्रचिती दिली. इतर प्रमुख भूमिकांमध्‍ये असलेले देवेंद्र दोडके, राजेश चिटणीस, सचिन गिरी यांनीदेखील नाटकाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. नागपुरातील 75 कलावंतांच्‍या सहभागाने या नाटकाला भव्‍यदिव्‍य रूप प्रदान केले.
 
gajanan-maharaj-bhakti-natya-live-performance - Abhijeet Bharat 
या नाटकाला शैलेश दाणी यांनी दिलेले संगीत, पार्श्वसंगीत मनाला भिडून गेले. मनोज साल्पेकर व शैलजा नाईक यांच्‍या प्रसंगानुरूप गीतांनी नाट्यरसिकांना खिळवून ठेवले. गण गण गणात बोते, शंकराचे तांडव, चमत्कार घडला सारखी गीते, संगीत, नृत्य याची बहार आणली. गजानन महाराजांच्या समाधीच्या प्रसंगाने संपूर्ण सभागृह भावूक झाले.
 
संकलन मनोज पिदडी यांचे होते तर समर्पक रंगभूषा बाबा खिरेकर यांची होती. नृत्य दिग्दर्शन अमोल मोतेवार यांचे होते. प्रकाश योजना किशोर बत्तासे यांची होती तर नेपथ्य सतीश काळबांडे यांनी सांभाळले. दिग्दर्शन सहाय्य अभिषेक बेल्लारवार व अमित सावरकर यांचे होते. प्रयोग व्यवस्थापकेची जबाबदारी अभय अंजीकर व दीपक गोरे यांनी पार पाडली. योगेश हटकर यांच्‍या स्पेशल इफेक्टमुळे नाटकात जीवंतपणा आला. नरेश गडेकर, मुकुंद वसुले आणि सारंग जोशी यांचेही नाटकासाठी विशेष सहकार्य लाभले. जयप्रकाश गुप्ता, संजय भेंडे, सुधीर दिवे, समीर सराफ, अनघा सराफ, वृंदा सराफ, महेश बंग, असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0