मुंबई :
जिओ स्टुडिओ व आमिर खान प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्रतिभावान दिग्दर्शिका किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies) या चित्रपटाच्या 'टीझर'ने भुरळ घालणारे एक अत्यंत मजेदार जग प्रेक्षकांसमोर साकार केले आहे. प्रदर्शित झालेल्या या टीझरचे सर्वत्र स्वागत होत आहे. प्रेक्षक वाट पहात असलेल्या या मजेशीर विनोदी साहसपटाची झलक चित्रपटाच्या टीझरमधून दिसून येते आहे. ‘लापता लेडीज’ची चर्चा सर्वदूर होत असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे.
या चित्रपटाचा भाग होण्याकरता प्रमुख प्रतिभावंतांचा जसा शोध घेतला गेला, त्या शोधाच्या विलक्षण कास्टिंग प्रक्रियेमुळे हा चित्रपट अधिक उल्लेखनीय झाला आहे. ही प्रक्रिया ‘सिनेमॅटिक ओडिसी’हून काही कमी नव्हती, याचे कारण असे की, निवड करताना ५ हजारांहून अधिक महत्त्वाकांक्षी कलावंतांच्या कसून स्क्रीन चाचण्या घेण्यात आल्या. या चित्रपटाकरता परिपूर्ण त्रिकूट शोधण्याचे काम अत्यंत निष्ठेने करण्यात आले होते, कारण निवड होण्यापूर्वी मुख्य कलाकारांना दोन महिन्यांच्या कालावधीत जिकरीच्या स्क्रीन चाचण्यांच्या अनेक फेऱ्यांना सामोरे जावे लागले होते.
'लापता लेडीज' हा चित्रपट सिनेरसिकांना एक सिनेमॅटिक गमतीशीर, वळणा-वळणाचा रोलरकोस्टर अनुभवण्याची संधी देईल, हे नक्की आणि चित्रपटासाठी कलाकार निवडताना त्याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. यांत कोणतेही आश्चर्य नाही की, या चित्रपटाबाबत सर्वांच्याच अपेक्षा अधिकाधिक उंचावल्या गेल्या आहेत. चित्रपटाच्या ‘टीझर’ने चाहत्यांची उत्सुकता अधिक चाळवली आहे, आणि सिनेरसिक चित्रपट प्रदर्शित होण्याचे दिवस उत्कंठेने मोजत आहेत. ‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स’मध्ये ‘लापता लेडीज’ चित्रपट दाखविण्यात आला आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात दिग्दर्शिका किरण राव यांना दाद दिली आणि त्यानंतर सर्वांनी उभे राहून मानवंदना देत, किरण राव यांचे स्वागत केले.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘लापता लेडीज’ चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले असून आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्स आणि ‘किंडलिंग प्रॉडक्शन्स’च्या बॅनर अंतर्गत बनविण्यात आला आहे. चित्रपटाची पटकथा बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांचे असून, अतिरिक्त संवाद दिव्यानिधी शर्मा यांनी लिहिले आहेत.