शेतातून सोयाबीन लांबविणारे तिघे जेरबंद; 34 हजारांचा मुद्देमाल जप्त

26 Oct 2023 15:55:13
  • तळेगाव दशासर पोलिसांची कारवाई
soybean-theft-three-arrested-talegaon-police - Abhijeet Bharat
 
धामणगाव रेल्वे : शेतातून सोयाबीन चोरी करणार्या तीन चोरांना तळेगाव दशासर पोलिसांनी मंगळवार, 24 ऑक्टोबर रोजी अटक केली. चेतन उर्फ रजत प्रकाश बिरे (30), अमित भारत बिरे (37) व प्रज्वल सुभाष पेंदाम (35,सर्व रा. हिरपूर, धामणगाव रेल्वे) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणला असून, चोराकडून 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
हिरपूर येथील रहिवासी योगेश्वर मधुकर कावडे यांच्या शेतातून 4 हजार 200 रुपयांचे एक क्विंटल सोयाबीन चोरी करण्यात आले होते. या घटनेची तक्रार योगेश्वर कावडे यांनी 21 ऑक्टोबर रोजी तळेगाव दशासर ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्यात हिरपूर येथीलच रहिवासी चेतन उर्फ रजत बिरे याचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अमित व प्रज्वलच्या मदतीने शेतातून सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून चोरलेले सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे, पवन आलोने, मनीष आंधळे, गौतम गवळे, नरेश लोथे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0