मधाचे गाव ‘आमझरी’ शासनाकडून दुर्लक्षित

26 Oct 2023 19:07:29
 
nandwan-ignored-by-government-despite-development-promise - Abhijeet Bharat
 
चुरणी : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्यातील निसर्ग संपन्न टुमदार आणि मधाचे गाव म्हणून ओळख असलेल्या ग्राम ‘आमझरी’ अजूनही शासनाकडून दुर्लक्षित आहे. एक वर्षापुर्वी या गावाला मधाचे गाव म्हणून विकसित करण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली होती, परंतु जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विदर्भाचे पहिले व महाराष्ट्रातील दुसरे आमझरी हे ‘मधाचे गाव’ विकासापासून रखडले आहे.
 
राज्य शासनाच्या मधु संचालनालय महाबळेश्वर येथील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून राज्यात मधाचे गाव विकसित करण्याची योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्राचे पहिले मधाचे गाव सातारा जिल्ह्यातील ‘मागर’ चे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करून विकसित करण्यात आले. त्यानंतर पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा तालुक्यातील आमझरी हे मधाचे गाव विकसित करण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यकारी संचालक आंशू सिन्हा यांनी आमझरी येथे वृक्षारोपण करून विदर्भातले पहिले व राज्यातले दुसरे मधाचे गाव म्हणून जाहीर केले होते.
 
जिल्हाधिकारी कौर यांनी मांडला होता प्रस्ताव
 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असलेल्या निसर्गरम्य अशा आमझरी निसर्ग पर्यटन संकुल या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. याच गावाची निवड जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी करून गावाच्या रोजगार उपलब्धतेसाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळास प्रकल्प विकास आराखडा बनवण्याच्या सूचना दिल्या, तसेच जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची योजना हाती घेण्यात आली. ही संकल्पना राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात आली. सत्ता बदल झाल्यानंतर विदर्भातील पहिले मधाचे गाव विकसित होईल अशी आशा मेळघाटातील ग्रामस्थांमध्ये पल्लवीत झाली असतांना अद्यापही या गावाच्या विकासासाठी कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. याउलट कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगाव हे गाव मधुसंचालनायाद्वारे विकसित करून सदर गावाला पर्यटन क्षेत्राचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्यातील आमझरी हे गाव अद्यापही दुर्लक्षितच आहे.
 
हवेत विरले आश्वासन ?
 
राज्य स्तरावरील अधिकारी श्रीमती अंशू सिन्हा यांच्या भेटीनंतर या गावाला महाराष्ट्र राज्य खादी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनीही भेट दिली. येथील निसर्ग सौंदर्य नैसर्गिक मधमाशांचे पोळे पाहून सर्वाधिक गरज असलेल्या 100 टक्के आदिवासीबहुल या गावाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले.
 
व्याघ्र प्रकल्पासोबत करार होणेच बाकी
 
आमझरी मधाच्या गावाच्या विकासासाठी खादी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्याघ्र प्रकल्पासोबत करार होणे प्रलंबित असल्याचे कळविले आहे. मधाच्या गावाचे समिती अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना खादी मंडळाद्वारे कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्क सूत्रांनी सांगितले आहे.
 
साहसी खेळ बंद
 
निसर्ग पर्यटन संकुलामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या करमणूकीसाठी उभारण्यात आलेले सहासी खेळ साहित्य जुने झाले असल्याने ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. सोबतच येथील युवकांचा रोजगारही बंद झाला आहे. मधाच्या गावामध्ये मधमाशी संगोपन व माहिती केंद्राच्या माध्यमातून येथील युवकांना रोजगार उपलब्ध होवू शकेल. याकरिता नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे याकरिता काय करतील? किंवा खादी मंडळाच्या नवनियुक्त कार्यकारी संचालक आर. विमला यांच्याकडून आमझरी गावाला किती प्राधान्य दिले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0