मोर्शी : पाल्याची वाचनक्षमता वाढविण्याकरिता पालकांची हातभार लावण्याकरिता येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच पालक सभा पार पडली. ज्या विद्यार्थ्यांची वाचनक्षमता कमी आहे, अश्या विद्यार्थ्यांच्या पालकांची ही पालक सभा होती.
विद्यालयाचे प्राचार्य प्रसाद देशमुख यांचे अध्यक्षतेत झालेल्या या सभेला पालक प्रतिनिधी अंबादास सिनकर, रोशनी ठाकूर, शिक्षक प्रतिनिधी नलिनी खवले आणि अजय हिवसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .या शाळेने वाचन वृद्धी प्रकल्प हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला असून जे विद्यार्थी वाचन करण्यामध्ये मागे पडल्याचे दिसून आले अशा ८३ विद्यार्थ्यांना निवडून त्यांचे वाचन समृद्ध करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. विशेषत: पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनक्षमता कमकुवत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालकांनी घरी त्यांच्याकडे थोडा वेळ देऊन वाचन करून घ्यावे आणि वाचनाची आवड कशी निर्माण होईल याकडे लक्ष द्यावे. दिलेला गृहपाठ थोडा वेळ देऊन करून घ्यावा असे मनोगत मुख्याध्यापक प्रसाद देशमुख यांनी व्यक्त केले. याप्रसंगी काही पालकांनी या शाळेच्या अभिनव उपक्रमाबद्दल मुलांच्या वाचन करण्यामध्ये वाढ होत असल्याचे कबूल केले. काही विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या प्रतिक्रिया देताना आपल्यात बदल होत असल्याचे कबूल केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन शिक्षक संदीप ठाकरे यांनी केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक राजेश मुंगसे, दिनेश सुखदेव, राहुल घुलक्षे, किशोर जाणे, यु.एस.बोन्डे, धनश्री कोंबे, अर्चना तराळे, राईकवार, एल. आर. लांडगे, सचिन चोपडे, सुषमा बोबडे उपस्थित होते.