- संत्रा पिक काढणी पश्चात व्यवस्थापन प्रशिक्षण
अमरावती : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना सर्व व्यवहार कुशलता पूर्वक हाताळता यावेत याकरिता मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक तथा मॅग्नेट अमरावती चे प्रकल्प अधिकारी दिनेश डागा यांनी केले ते महाराष्ट्र शासन पणन मंडळ, आशियाई डेव्हलपमेंट बँक अर्थसाहाय्यक मॅग्नेट प्रकल्प व के.पी.एम.जी. इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे आयोजित संत्रा पिक काढणी पश्चात व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह, अॅग्रिबिझनेस एक्स्पर्ट (मॅग्नेट) अमरावती चे निलेश वानखडे, कन्सल्टंट, के.पी.एम.जी. इंडिया चे महेश पाटील, मॅग्नेट चे प्रकल्प अंमलबजावणी सहायक कक्ष अधिकारी निखिल धानोरकार, अॅग्रि कन्सलटंट सचिन माळकर, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ प्रफुल्ल महल्ले, हवामान शास्त्रज्ञ डॉ. सचिन मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना दिनेश डागा म्हणाले की ६० टक्के अनुदान २० टक्के बँक कर्ज आणि केवळ २० टक्के कंपनीचे स्वतःचे भांडवल असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. एक हजार कोटीचा हा प्रकल्प असून २०२६-२७ पर्यंत हा प्रकल्प चालणार आहे. शेतकरी कंपन्यांना या प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळावी याकरिता अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून या प्रशिक्षणातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना प्रकल्पाची उभारणी करताना येणाऱ्या अडचणी यावर मात्र मात करणे मालाचे ब्रॅण्डिंग, प्रोसेसिंग आणि मार्केटिंग कसे करावे याचे संपूर्ण मार्गदर्शक मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.