भाव बदलल्याने भावंडात दुरावा!

    26-Oct-2023
Total Views |
 
changing-relationships-and-values - Abhijeet Bharat
 
लहानपणी ज्या भाऊ किंवा बहिणीसोबत अर्धे आयुष्य घालविले किंवा बालपणातील सुखद क्षण अनुभवले त्याच भावंडांबद्दल भाव बदलल्याने आज दुरावा निर्माण झालेला दिसत आहे. भावंडांमध्ये असलेले प्रेम अखेरपर्यंत टिकविता आले तर, ते आयुष्यातील सुखद क्षण आणखी अनुभवता येईल. ज्यांना हे प्रत्यक्षात उतरविता आले, ती भावंडे आणि त्यांना जन्म देणारे आईवडील खरोखरच भाग्यवान समजावे.
 
असे म्हणतात पोटचे आले की, पाठच्यांचा विसर पडतो, आणि ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. एकत्र कुटूंब व्यवस्था कोलमडून गेल्याने किंवा संवाद संपल्याने हे होत आहे. आपले दुःख व्यक्त करायला जवळचे कोणीच नाही, असा भाव तयार होऊ लागला आहे. यामुळे माणूस एकलकोंडा होऊन मनोरूग्ण बनू लागला आहे.
 
याचा शेवट आनंद हरवून फक्त नैराश्य उरले आहे, अंती मी काय मिळविले? याचे उत्तर त्याला शून्य असे मिळत आहे. हे टाळायचे असेल तर आपण जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, तसा भावंडांनाही वेळ दिला पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारून पहा. कोणतेही काम नसताना आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे सहज भेटायला गेलो असेल याला किती वर्षे झाले. मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. खाऊच्या एका घासासाठी पाठीत धपाटा मारणारी मोठी बहीण, चिमटा काढून पळून जाणारी धाकटी बहीण, आपण बाहेरून आलो तर काहीतरी आणले असेल म्हणून खिशाकडे, हाताकडे पाहणारा धाकटा भाऊ, आजही ते तसेच आहेत.
 
फक्त आपला भाव आणि स्वभाव बदला. वय कितीही होऊ द्या, थोरल्याने अधिकार गाजवलाच पाहिजे आणि धाकट्याने हट्ट केलाच पाहिजे. आपण जेथे असू तेथे आपली भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे. आपल्या भावंडापैकी कुणीही लाचार असू नये यासाठी जे संपन्न असतील त्यांनी त्याला सहकार्य करून प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा. आपसात बसून विचारविनिमय करावा जेणेकरून एकमेकांना योग्य दिशा मिळेल. संपूर्ण जग जरी विरोधात असले तरी भावंड सोबत असतील तर आपण जग जिंकू शकतो. म्हणून हे शक्य आहे त्यासाठी वर्षातून किमान एकवेळ पूर्ण एक दिवस सर्व भावंडांनी एकमेकांसाठी द्या. त्यादिवशी आपले आईवडील आणि आपली भावंडे मिळून एक दिवस एकत्र येऊन एक दिवसाची सहल आयोजित करा.
 
कुवत असेल त्याने सर्व खर्च करा, कुवत नसेल तर, तो एक दिवस सुट्टी घेऊन फक्त सर्व भावंडे आईवडीलांसोबत रहा आणि अनुभव घेऊन पहा हा अनुभव आणि आईवडील व भावंडांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात वर्णन करता येणार नाही. या गोष्टी पैसे देऊन, हिस्सा घेऊन वाटणी करून कोणालाही मिळविता येणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही वेगळे राहणार नाही. ही प्रतिज्ञा भावांनी केली आणि प्रत्यक्षात अंमलात आणली तर त्यांना जन्म देणाऱ्या आईवडीलांइतके भाग्यवान जगात कोणीही नाही. हे अवघड आहे, पण अशक्य मात्र निश्चित नाही. हेच रामराज्य आहे आणि असे घर आजही अयोध्या आहे.
 
मारोती पाटणकर