- पोहरा बंदी, भानखेडा परिसरात भीतीचे वातावरण
अंजनगाव बारी : पोहरा बंदी, भानखेडा, गोविंदपुर, कोंडेश्वर परिसरात गेल्या आठ दिवसापासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, या परिसरातील 12 बकर्या फस्त केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांसमोर आर्थिक संकट उभे झाले असून, जीविताचाही धोका निर्माण झाला आहे.
या परिसरातील जंगल दाट असल्याने बिबट दडुन बसतात. दुपारच्या वेळी गुराखी जनावरे चारण्यासाठी जंगलात असताना, झुडपात दडुन असलेल्या बिबट्यांनी गुराख्याच्या नकळत 12 बकर्या फस्त केल्या. गुराख्याने जनावरे घरी नेली असता, त्यामध्ये 12 बक:या कमी असल्याचे शेतकरी दगडू धनगर यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गुराख्यांना विचारणा केली. त्यानंतर शोध घेतला असता बक:या मृत अवस्थेत जंगलात आढळून आल्या. त्यामुळे त्या बक:या वन्यप्राण्याने खाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी विद्यापीठ परिसरातील तलावाजवळ बिबट्यांने आधी गाय फस्त केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने वनविभागाच्या मदतीने उपाययोजना केल्या. मात्र गत आठवड्यात विद्यापीठातील वसतिगृहाच्या मार्गावर पुन्हा बिबट्या दिसला होता.
निंबोलीत बिबट्याचे तर वसाडमध्ये वाघाचे ठसे
धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली शिवारात बिबट, तर वसाड शिवारात वाघाचे पगमार्क आढळून आल्यामुळे परिसरातील निर्माण झाली आहे. वनविभागातर्फे गावकर्यांना दवंडीद्वारे सूचना देण्याचे ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. परिसरामध्ये निंबोली, वसाड कावली, चिंचपूर, शिदोडी, पिंपळखुटा आदी गावांमध्ये अनेक शेतकरी वाघाविषयी सांगत आहे. त्यानुसार ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन वनविभागाला कळविले. त्यांनी जंगलांमध्ये पाहणी करण्यासाठी आले असता वाघाचे ठसे त्यांना आढळून आले. रात्रीच्या वेळेला शिवारात एकटे कुणीही राहू नये आणि योग्य सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी केले आहे.