अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदादेखील अमरावती येथील अंबादेवी आणि एकवीरा देवीला अष्टमीच्या दिवशी 3 हजार 111 किलो सुक्यामेव्याचा नैवैद्य अर्पण करण्यात आला आहे. मागील 25 वर्षांपूर्वीपासून अंबादेवी, एकवीरा देवी आरती मंडळाने ही परंपरा कायम ठेवली आहे.
विदर्भाची कुलस्वामिनी आणि अमरावतीच्या ग्रामदैवत असणार्या अंबादेवी आणि एकविरा देवीला सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी महा अष्टमीच्या पर्वावर 3 हजार 111 किलोचा सुकामेव्याचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. अंबादेवी आणि एकविरा देवी आरती मंडळाच्यावतीनं या प्रसादाचं वितरण भाविकांना केलं जात आहे. संपूर्ण सुकामेवा एकत्रित केल्यावर त्यातील काजू, बदाम, चारोळी, गोडंबी, जरदाळू, खारीक असे सर्व साहित्यांचे स्वतंत्र ताट सजवून ते आरती मंडळाच्या वतीनं वाजत-गाजत अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या गाभार्यात नऊ कन्यांच्या हाताने चढविले जातात. पहाटे देवीला हा प्रसाद चढवल्यावर पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना या प्रसादाचे वितरण केले जात आहे.