पंतप्रधान मोदी उद्या शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात करणार पूजा

25 Oct 2023 16:09:16
  • पंतप्रधान मोदींचा 26 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गोवा दौरा
narendra-modi-visits-shirdi-maharashtra-and-goa-tour - Abhijeet Bharat
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी एक दिवशीय महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या सुमारे १ वाजता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतील. पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन देखील होणार आहे. सुमारे २ वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जल पूजन करून या धरणाच्या डाव्या कालव्याची यंत्रणा राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर सुमारे ३.१५ वाजता पंतप्रधान शिर्डी येथे एका सार्वजनिक सभेला उपस्थित राहणार असून आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू अशा बहुविध क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उदघाटन करणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी ६:३० वाजता गोव्यात पोहोचतील. त्यांच्या हस्ते ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धांचे उद्घाटन होईल.
 
पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात दौरा
 
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणारे शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुल म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्याधुनिक अशी भव्य इमारत असून येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी आरामदायी प्रतिक्षालय बांधण्यात आले आहे. दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह या इमारतीत अनेक सुसज्ज प्रतिक्षालये आहेत. यामध्ये कपडे बदलण्यासाठी खोल्या, स्वच्छतागृह, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी वातानुकूलित सार्वजनिक सुविधांची तरतूद आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर २०१८ मध्ये या दर्शन रांग संकुलाची पायाभरणी झाली होती.
 
पंतप्रधान निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जाळे (८५km) राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे जलवाहिन्यांद्वारे थेट पाईपमधून जल वितरण सुविधा उपलब्ध झाल्याने ७ तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील ६ आणि नाशिक जिल्ह्यातील १) १८२ गावांना याचा लाभ होईल. निळवंडे धरणाची संकल्पना सर्वप्रथम १९७० मध्ये मांडण्यात आली होती. सुमारे ५१७७ कोटी रुपये खर्चून ते विकसित करण्यात आले आहे.
 
त्यानंतर एका सार्वजनिक सभेदरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे उदघाटन होणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या 86 लाख लाभार्थ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार असल्याने त्यांना लाभ होईल.
 
पंतप्रधानांच्या हस्ते अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर मार्ग रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (१८६ किमी); जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (२४.४६ किमी), NH-१६६ (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा इत्यादी प्रकल्पांचे उदघाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील माता आणि बाल आरोग्य विभागाची पायाभरणी देखील होईल. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुषमान कार्ड आणि स्वामित्व कार्डाचे वाटप होईल.
 
असा राहील पंतप्रधान मोदींचा गोवा दौरा
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील क्रीडासंस्कृतीचा कायापालट झाला आहे. केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत प्रचंड सुधारणा झालेली दिसून येत आहे. अव्वल दर्जाचे खेळाडू शोधून खेळांची लोकप्रियता वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे महत्त्व ओळखून देशात राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले जात आहे.
 
पंतप्रधान २६ ऑक्टोबर २०२३ रोजी गोव्यात, मडगाव, येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे ३७ व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील. ते खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंनाही संबोधित करतील. गोव्यामध्ये सर्व प्रथमच राष्ट्रीय क्रीडास्पर्धा होत आहेत. या स्पर्धा २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील १० हजारहून अधिक खेळाडू २८ ठिकाणी ४३ हून अधिक क्रीडा शाखांमध्ये भाग घेणार आहेत.
Powered By Sangraha 9.0