भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सर्वोत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज अशी ज्यांची ओळख आहे ते भारताचे माजी कर्णधार, फिरकीचे जादूगार बिशनसिंग बेदी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम फिरकी गोलंदाज हरपला आहे.
२५ सप्टेंबर १९४६ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेले बिशन सिंग बेदी यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. वयाच्या पंधराव्या वर्षीच बिशन सिंग बेदी यांनी पंजाबच्या रणजी संघात पदार्पण केले. १९६८ पासून ते दिल्ली संघाकडून रणजी स्पर्धेत खेळू लागले. १९७४ - ७५ च्या रणजी हंगामात त्यांनी ६४ विकेट्स घेण्याचा विक्रम केला. हा त्यावेळी एका हंगामात रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळींचा विक्रम होता. आपल्या फिरकीच्या बळावर त्यांनी दिल्लीला रणजी चषकही मिळवून दिला होता. भारतीय संघात निवड झाल्यावर त्यांनी आपल्या फिरकीच्या तालावर अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले.
१९७० च्या दशकात बेदी, प्रसन्ना, चंद्रा आणि वेंकट या भारताच्या सुप्रसिद्ध फिरकी चौकडीने क्रिकेटवर अक्षरशः राज्य केले. हा त्या काळातीलच नव्हे तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकी मारा समजला जातो. बिशनसिंग बेदी यांची डावखुरी गोलंदाजी खेळणे अनेकांना जड जायचे. ते चेंडूला भरपूर उंची द्यायचे. वेगातील बदल, टप्पा बाक (लूप) यांचा खुबीने वापर करून बेदी यांनी अनेक सामने गाजवले. त्यांनी ६७ कसोटीत २६६ विकेट्स घेतल्या. त्यांची सरासरीही २८.७१ इतकी चांगली होती. बिशन सिंग बेदी यांनी ६० षटकांच्या विश्वचषक सामन्यात सर्वोत्तम इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करण्याचा विक्रम केला. त्यांनी १२ षटकात ८ धावा देत केवळ ०.५० च्या इकॉनॉमी रेटने १ विकेट घेतली होती. काउंटी स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी केली. नोर्थम्पटनशायर संघाकडून खेळताना त्यांनी ३७० विकेट्स घेतल्या तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १५६० विकेट्स घेतल्या.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर सुनील गावसकर यांच्या जागी त्यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली. बिशनसिंग बेदी हे निडर आणि स्पषटवक्ते होते त्यामुळेच काहीवेळा ते वादातही सापडले. १९७५ - ७६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात जमैका येथील कसोटीत त्यांनी दोन्ही वेळा भारताचा डाव लवकर घोषित केला, वेस्ट इंडिजच्या दहशतवादी गोलंदाजीचा निषेध म्हणून! एकदा न्युझीलंड दौऱ्यावर भारताचे प्रशिक्षक म्हणून गेले असता, आपल्या संघाच्या सुमार कामगिरीने वैतागले नि 'साऱ्या भारतीय संघाला हिंद महासागरात बुडवले पाहिजे' असे बोलून गेले! त्यांच्या फिरकी गोलंदाजीप्रमाणेच बेदी यांचे रंगीबेरंगी फेटे (पटके) ही लक्षवेधी ठरायचे. आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम गोलंदाज ठरलेले बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे. फिरकीचे जादूगार बिशनसिंग बेदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.