मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल आज मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना आज अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर ते त्यांच्या खोलीतील फरशीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळून आले असल्याचा दावा क्रेमलिनच्या एका इनसाइडरद्वारे चालवल्या जाणाऱ्या टेलिग्राम चॅनलवरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
पुतिन यांच्या रक्षकांना ते त्यांच्या खोलीच्या मजल्यावर कोसळलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. जनरल एसव्हीआर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्को वेळेनुसार रविवारी रात्री 9 वाजता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना राष्ट्राध्यक्षांच्या खोलीतून आवाज आणि खाली पडण्याचाही आवाज आला.
अहवालात म्हटले आहे की, 'दोन सुरक्षा अधिकारी ताबडतोब राष्ट्राध्यक्षांच्या बेडरूममध्ये गेले आणि त्यांना पुतिन बेडच्या शेजारी जमिनीवर पडलेले दिसले. त्यांच्या शेजारी असलेले टेबलही उलटले होते. असे म्हंटले जात आहे की, जेव्हा राष्ट्राध्यक्ष पुतिन जमिनीवर पडले त्यावेळी त्यांनी त्यांच्या जवळपास असलेल्या वस्तू पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याही खाली पडल्याने खोलीतून जोरदार आवाज आला. चॅनलने दावा केला आहे की, पुतिन डोळे मिटून जमिनीवर पडलेले असताना त्यांना चक्कर येत होती. निवासस्थानी आणि शेजारच्या खोलीत ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना ताबडतोब पाचारण करण्यात आले.