सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था बळकट करणार

24 Oct 2023 13:31:23
  • वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
healthcare-improvements-in-sangli-and-miraj-hospitals - Abhijeet Bharat
 
सांगली : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय सर्वोपचार रुग्णालय परिसरात होणाऱ्या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावास लवकरच निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रुग्णालयामार्फत पाठविण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून येथील आरोग्य सेवा बळकट केल्या जातील. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
 
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय सर्वोपचार रुग्णालयास भेट देवून तेथील आरोग्य सेवा व सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.
 
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सांगली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू, गरीब रुग्णास आवश्यक वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहिजेत. या ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार यासारखे विभाग सुरु असणे आवश्यक वाटते. सांगली येथे होणाऱ्या ५०० खाटांच्या रुग्णालयास आवश्यक सर्व मदत केली जाईल. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातून औषधे उपलब्ध करुन द्यावीत. आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्या रुग्णालयात करण्यात याव्यात. कोणत्याही प्रकारे रुग्णांची हेळसांड होवू नये याची आरोग्य प्रशासनाने दक्षता घ्यावी. रुग्णालयासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल, असे ते म्हणाले.
 
सांगली येथील रुग्णालयात एसटीपी सिस्टीम करण्याकरिता पाठविण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्याची ग्वाही देवून वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सांगली व मिरज येथील रुग्णालयात आय.सी.यु. बेड वाढविण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयातील सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. याबरोबच फायर ऑडिटही करण्याची सूचना त्यांनी केली. बैठकीपूर्वी मुश्रीफ यांनी रुग्णालयात विविध विभागांना भेट देवून आरोग्य व्यवस्थेची पाहणी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
Powered By Sangraha 9.0