खराब हवेचा आरोग्यावर परिणाम

24 Oct 2023 12:58:34
 
health-impact-poor-air-quality-mumbai - Abhijeet Bharat
 
मुंबई आणि परिसराच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरायला लागली आहे. गेले काही दिवस मुंबई, नवी मुंबई, उरण या ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरली आहे याचा दुष्परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. याआधी हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरल्याने दिल्लीची काय अवस्था झाली हे आपण पाहिलेच आहे. आता मुंबईही त्याच मार्गाने चालली आहे. विशेष म्हणजे सफर या संस्थेने केलेल्या पाहणीत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी दिल्लीपेक्षाही जास्त खराब आहे, असे दिसून आले आहे. हे अधिक चिंताजनक आहे. मुंबईच्या हवेत धुळीचे बारीक कण असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, वृध्द नागरिक, गरोदर महिला तसेच रुग्णांवर होऊ लागला आहे. मुंबईत दम्याचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यामागेही हेच कारण आहे.
 
मुंबईतील हवेची गुणवत्ता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यात प्रामुख्याने सांगता येण्यासारखे कारणे म्हणजे वाढते औद्योगिकीकरण, वाहनांचे प्रदूषण, वाढती बांधकामे ही आहेत. मुंबईत, रस्ते, मेट्रो, इमारती आदींचे बांधकामे सुरू असून त्यासोबतच वाहनांमधून उत्सर्जित होणारे कणही वातावरणात जमा होतात. हवेतील धूळ, कण आणि इतर प्रदूषण करणारे घटक पावसामुळे वातावरणातून बाहेर पडतात. पावसाळा संपला तरी हे कण हवेतच राहतात. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी घासरण्यामागे देखील हेच कारणे आहेत. याशिवायही आणखी काही कारणे असू शकतात.
 
दरवर्षी दिवाळीनंतर हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावल्याची बाब समोर येते. कारण देशभर दसरा- दिवाळीमध्ये फटाके उडवली जातात. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे हवेची पातळी खालावते. यावर्षी मात्र दिवाळी अधिक हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. आजच ही अवस्था असेल, तर दिवाळी नंतर काय अवस्था असेल याचा विचारच न केलेला बरा. म्हणूनच मुंबईतील या दूषित हवेचे गांभीर्य ओळखायला हवे. मुंबईची ही दूषित हवा कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करायला हवेत. मुंबईच्या हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती नेमायला हवी. या समितीने मुंबईच्या हवेचा दर्जा कसा सुधारेल याचा अभ्यास करावा. त्यासाठी या समितीला परदेशातील तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली तरी सरकारने ती मिळवून द्यावी. कारण मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरणे म्हणजे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येणे. मुंबईकरांचे आरोग्य टिकवायचे असेल तर हवेच्या प्रदूषणावर ठोस उपाय करावाच लागेल.
 
दिवाळीनंतर हे वायू प्रदूषण आणखी वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने सरकारने दिवाळीत वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर देखील बंदी घालावी. कारण फटाक्यांच्या प्रदूषणाने हवा आणखी खराब होणार आहे. त्याचे दुष्परिणाम शेवटी मुंबईकरानांच भोगावे लागणार आहे. चक्रीवादळ, मुसळधार पाऊस याची माहिती जशी एसएमएसने (SMS) दिली जाते, तशी दुसऱ्या दिवसाच्या संभाव्य प्रदूषण पातळीची माहिती देता येईल असे तंत्रज्ञान तयार करावे. जेणेकरून नागरिक प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करतील. वाढते वायू प्रदूषण ही खूप गंभीर समस्या आहे. ही समस्या केवळ मुंबई - दिल्ली सारख्या मोठ्या शहरातच आहे असे नाही, संपूर्ण देशातच ही समस्या आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कायम स्वरुपी ठोस उपाययोजना करावेत.
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0