- प्रतापनगर शिक्षण संस्थेत जाहीर व्याख्यान
नागपूर : प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दीप प्रज्वलन करून अभिवादन केले.
यावेळी मंचाकावर प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, उपाध्यक्ष शंकर पहाडे, सहसचिव प्रशांत वैद्य उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांना शाळेतर्फे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शाळेत संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मोहन भागवतांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी शाळेचे सुवर्ण जयंती व देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शाळेत आयोजित विविध विद्यार्थीपयोगी उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे विविध दाखले देत त्यांच्यात असलेली प्रामाणिकपणा, निष्ठा, शौर्य, स्त्री-दाक्षिण्य व कुठल्याही लढाईचे नियोजन यात शिवाजी महाराज कसे पटाईत होते हे त्यांनी विविध दाखले देत समजावून सांगितले. अशक्य असलेले काम शक्य करून दाखविणे हा वारसा शिवाजी महाराजांकडून भारत देशाने घेतला. यात त्यांनी चांद्रयान-३ मोहिमेचे उदाहरण देत भारत हा जगातील असा एकमेव देश आहे, जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. म्हणून आजच्या पिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून त्यांचा वारसा जपण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका वंदना काळे यांनी तर आभार सहसचिव प्रशांत वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे निरंजन हरकरे, श्रीराम महाकांळीवार, प्रशांत चौधरी, सुनील गावपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री टिल्लू, श्रावण सुरकार, अजय निलदावार, आरती कुलकर्णी, डॉ. अविनाश भाके, अनंता अंभोरकर सह मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. आयोजनाकरिता शाळेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. श्रीकांत पेंढारकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.