आज नवरात्रीचा नववा म्हणजेच शेवटचा दिवस. नवमीच्या दिवशी आज देवीच्या नवव्या रूपाची पूजा केली जाते. देवी सिद्धिदात्रीला पार्वती देवीचे नववे स्वरूप मानले जाते. सिद्धिदात्री म्हणजेच ती सर्व प्रकारची सिद्धी देणारी अशी ही देवी आहे. नवमीला शास्त्रीय विधी आणि पूर्ण भक्तिभावाने साधना करणाऱ्या भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात.
पौराणिक कथेनुसार, देवी सिद्धिदात्रीच्या कृपेने महादेवानी सर्व सिद्धी प्राप्त केली होती. असे म्हटले जाते की, सिद्धिदात्री देवीच्या कृपेने महादेवाचे अर्धे शरीर देवीचे झाले. यानंतर लोकात ते 'अर्धनारीश्वर' म्हणूनही प्रसिद्ध झाले. सिद्धिदात्री देवीला सर्वात शक्तिशाली स्वरूपातून एक मानले जाते. देवीचे हे रूप फार सौम्य आणि आकर्षक आहे. चार भुजा असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातात चक्र, शंख, गदा आणि कमळाचे फुल असते. देवी संपूर्णतः उमललेल्या कमळावर विराजमान असते.
मार्कंडेय पुराणानुसार, देवी सिद्धीदात्रीजवळ अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व या आठ अलौकिक शक्ती किंवा सिद्धी आहेत. देवी सिद्धीदात्रीचे पूजन केल्याने भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. या सिद्धिदात्री मातेच्या उपासनेनंतर भक्तांच्या आणि साधकांच्या सर्व सांसारिक आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात.