इंग्रजांनी आपल्या देशावर सुमारे पावणे दोनशे वर्ष राज्य केले. या पावणे दोनशे वर्षांत त्यांनी आपल्यावर अनेक अन्याय अत्याचार केले. इंग्रजांच्या याच अन्याय अत्याचाराच्या विरोधात लाखो ज्ञात अज्ञात देशभक्त बांधवांनी लढा दिला. त्यात काही महिलाही होत्या. हे मात्र अतिशय कमी लोकांना माहिती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महिलांची यादी जर काढली तर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या महिलांची नावे आपल्याला आठवतील. कारण बऱ्याच महिला स्वातंत्र्य सैनिकांची म्हणा किंवा देशासाठी त्याग करणाऱ्या देशभक्त महिलांची म्हणा आपल्या इतिहासकारांनी नोंदच घेतली नाही. त्यामुळे त्यांचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आलाच नाही. अशाच एका देशभक्त महिला स्वातंत्र्य सेनानीच्या शौर्याची माहिती आज आपण या लेखातून घेऊ. कारण आज त्या महान महिला स्वातंत्र्य सेनानीची जयंती आहे. त्या महान स्वातंत्र्य सेनानीचे नाव आहे कित्तुरची राणी चेनम्मा.
२३ ऑक्टोबर १७७८ रोजी बेळगाव येथील काकटी या छोट्या गावात राणी चेन्नमा यांचा जन्म झाला. लहानणापासूनच धाडसी असलेल्या राणी चेन्नमा यांना त्यांचे वडील धुळाप्पा देसाई गौड्रारू यांनी घोडेस्वारी करणे, तलवार चालवणे, भाला फेकणे याचे शिक्षण दिले. वयाच्या १५ व्या वर्षी राणी चेन्नमा यांचा विवाह देसाई कुटुंबातील राजा मल्लसराज यांच्याशी झाला. मात्र १८२४ हे वर्ष त्यांच्यासाठी दुर्भग्याचे वर्ष ठरले. कारण याच वर्षी त्यांच्या पतीचे आणि मुलाचेही निधन झाले. एकाच वर्षी पती आणि मुलगा सोडून गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. राजा मल्लसराज यांच्या निधनाने त्यांच्या राज्यात अस्थैर्य माजले. याचा लाभ घेण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्या राज्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. इंग्रजांकडून राज्य वाचवण्याची फार मोठी जबादारी राणी चेन्नमा यांच्यावर येऊन पडली. मात्र त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी तात्काळ आपली राजधानी डोंगर भागात हलवली. राजगादीला वारस असावा म्हणून त्यांनी शिवलिंगप्पा नावाचा पुत्र दत्तक घेतला व त्याला राज्याचा उत्तराधिकारी बनवले. मात्र तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉर्ड डलहौसी याने दत्तक विधान नाकारत शिवलिंगप्पा याची राज्याचा वारसदार म्हणून हाकलपट्टी करण्याचा आदेश दिला. जर एखाद्या राज्याचा राजा निधन पावला आणि त्याला वारस नसेल, तर दत्तक असलेला पुत्र राज्याचा वारस होऊ शकत नाही, त्यामुळे ते राज्य खालसा करून तिथे ब्रिटिश अंमल सुरू करण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला होता. त्यामुळे कोणत्याही परस्थितीत आपले राज्य इंग्रजांच्या ताब्यात जाऊ द्यायचे नाही, असा निर्धारच राणी चेन्नमा यांनी केला होता.
कित्तुरचे राज्य हे धारवाड जिल्ह्यात येत होते. सेंट जॉन थाच्रेय हा त्यावेळी धारवाडचा गव्हर्नर होता, तर चॅप्लिन हा कमिशनर होता. या दोघांनीही राणी चेन्नमा यांना राज्य खालसा करण्याची सूचना केली आणि तसे न केल्यास युद्धास तयार राहण्यास सांगितले. राणी चेन्नमा यांनी शेवटचा पर्याय म्हणून बॉम्बे प्रेसिडेंटचे लेफ्टनंट गव्हर्नर एल्फिन्स्टन यांना राज्य खालसा करण्याबाबत विनंती अर्ज केला. मात्र त्यांनी तो धुडकावून लावत कितुरवर हल्ला चढवला. इंग्रजांनी कित्तुरवर हल्ला चढवला आणि कित्तुरचा खजिना लुटण्याचा प्रयत्न केला. कित्तुरच्या खजिन्यात त्यावेळी मौल्यवान दागदागिने आणि दीड कोट रुपये इतका खजिना होता. इंग्रजांच्या मद्रास नेटीव्ह हॉर्स अर्टेलरीच्या तिसऱ्या तुकडीत २० हजारांपेक्षा अधिक सैनिक होते. त्यात सुमारे ४०० पेक्षा अधिक सैनिक हे बंदूकधारी होते. मात्र राणी चेन्नमा यांचे सैन्यही कमी नव्हते, त्यांनी इंग्रज सैन्या विरुद्ध निकराचा लढा दिला आणि इंग्रज सैन्याचा धुव्वा उडवला.
राणी चेन्नमा यांचे सैन्य आपल्याशी अशाप्रकारे धैर्याने मुकाबला करतील, अशी अपेक्षा इंग्रजांना नव्हती. त्यांनी राणी चेन्नमाच्या सैन्याला हलक्यात घेतले. राणी चेन्नमाचे सैन्याचे बळ इंग्रजांच्या तुलनेत अल्प होते. मात्र राणी चेन्नमा यांनी आपल्या सैनिकांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. आपली राणी महिला असूनही इंग्रजांशी निकराने लढते हे पाहून त्यांनाही स्फुरण चढले आणि त्यांनी इंग्रज सैन्याचा पराभव केला. या युद्धात सेंट जॉन हा गव्हर्नर मारला गेला. इंग्रजांच्या काही अधिकाऱ्यांना राणी चेन्नमा यांच्या सैनिकांनी बंदी बनवले. युद्ध बंदी करण्याच्या अटीवरच या अधियाऱ्यांची सुटका करण्यात आली. युद्ध बंदीचा करार करूनही इंग्रज अधिकाऱ्यांनी तो पाळला नाही. कमिशनर चॅप्लिन याने मोठ्या ताकदीनिशी कुत्तुरवर पुन्हा हल्ला केला. यावेळीही राणी चेन्नमाच्या सैन्याने निकराने लढा दिला. मात्र बैल होगल किल्ल्यात राणी चेन्नमा पकडल्या गेल्या आणि त्यांना कैदेत टाकण्यात आले.
२१ फेब्रुवारी १८२९ रोजी इंग्रजांच्या कैदेतच राणी चेन्नमा यांचे निधन झाले. राणी चेन्नमा यांच्या निधनानंतरही राणीचे सैन्य इंग्रजांशी लढत राहिले. मात्र तो लढा अपयशी ठरला. मात्र राणी चेन्नमा यांचे शौर्य पाहून इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना सलाम केला. राणी चेन्नमा यांचे शौर्य इतिहासाच्या पानावरील एक स्फूर्तिदायक अध्याय आहे. मात्र आजही हा इतिहास तरुण पिढीपासून दूर आहे म्हणूनच हा लेख प्रपंच. भारतीय इतिहासातील एक सुवर्ण अध्याय म्हणून राणी चेन्नमा यांच्या लढ्याकडे पाहायला हवे. जयंतीदिनी राणी चेन्नमा यांना विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.