भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव देशातील उमरोई छावणी येथे सुरू

23 Oct 2023 18:44:49
 
india-malaysia-joint-military-exercise-harimau-shakti-2023 - Abhijeet Bharat
 
नवी दिल्‍ली : भारतीय आणि मलेशियाच्या लष्करा दरम्यानचा संयुक्त द्विपक्षीय प्रशिक्षण सराव 'हरिमऊ शक्ती 2023 आज भारतातील उमरोई छावणी येथे सुरू झाला. मलेशियाच्या लष्कराच्या तुकडीत मलेशियन सैन्याच्या 5 व्या रॉयल तुकडीच्या सैन्याचा समावेश आहे. भारतीय दलाचे प्रतिनिधित्व रजपूत रेजिमेंटच्या तुकडीद्वारे केले जात आहे. या आधीचा प्रशिक्षण सराव पुलाई, क्लुआंग, मलेशिया येथे नोव्हेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात आला होता.
 
5 नोव्हेंबर 2023 पर्यंत नियोजित हरिमऊ शक्ती सरावात दोन्ही बाजुच्या अंदाजे 120 जवानांचा सहभाग आहे. प्रचलित परिस्थितीत बहु क्षेत्रीय मोहिमा आयोजित करण्यासाठी लष्करी क्षमता वाढवणे हे या सरावचे उद्दिष्ट आहे. या सरावा दरम्यान दोन्ही तुकड्या एक संयुक्त कमांड पोस्ट स्थापन करतील आणि संयुक्त देखरेख केंद्रासह एकात्मिक देखरेख ग्रीड स्थापन करतील.
 
दोन्ही बाजू जंगल/निमशहरी/शहरी वातावरणात संयुक्त सैन्याच्या सरावाची तालीम करतील. याशिवाय, गुप्तचर संकलन, एकत्र येण्याच्या आणि विखुरण्याच्या कवायती याचा देखील यात समावेश आहे. या सरावात ड्रोन/यूएव्ही आणि हेलिकॉप्टरचा सरावही पाहायला मिळेल. दोन्ही लष्करे अपघात व्यवस्थापन आणि निर्वासन ड्रिलचा सराव करतील. दोन्ही दले लॉजिस्टिक व्यवस्थापन आणि बटालियन स्तरावर तग धरून राहण्यासाठीच्या प्रशिक्षणाचा सराव यावर चर्चा करतील.
 
प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, रणनीतिक पातळीवर कवायती आयोजित करणे आणि एकमेकांसोबत सर्वोत्तम सरावाचे आदानप्रदान करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. निम-शहरी भागात 48 तासांच्या प्रमाणीकरण सरावासह हा सराव संपेल. भारतीय लष्कर आणि मलेशियातील लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्याची पातळी वाढवणे हे 'हरिमऊ शक्ती' या सरावाचे उद्दिष्ट आहे, यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांनाही चालना मिळेल.
Powered By Sangraha 9.0