Navratri 2023 : नवरात्राचा आठवा दिवस देवी महागौरीला समर्पित

22 Oct 2023 08:04:16

Goddess Mahagauri
 
 
नागपूर :
नवरात्राचा (Navratri 2023) आजचा आठवा दिवस. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या प्रत्येक दिवसाचे आपले महत्व आहे. परंतु, नवरात्राच्या अष्टमीला विशेष महत्व असते. म्हणूनच अष्टमीला महाअष्टमी असेही म्हटले जाते. भाविक नवरात्राच्या नऊ दिवसाचे उपवास करतात. पण काही कळणास्तव तर पूर्ण नऊ दिवस उपवास करण्यास जमले नाही तर, बरेच जण महाअष्टमीच्या दिवशीचा उपवास पाळतात. तसेच आजच्या दिवशी कन्या पूजन देखील केली जाते. या नऊ कन्यांना देवीचे नऊ स्वरूप मानून त्यांचे पूजन केले जाते आणि त्यांना भोजन दिले जाते.
 
नवरात्राचे (Navratri 2023) नऊ दिवस हे देवी पार्वतीच्या नऊ स्वरूपांना समर्पित असतात. दुर्गा देवीचे आठवे स्वरुप महागौरीचे आहे. त्यामुळे महाष्टमी दिवस हा देवी महागौरीच्या पूजेसाठी समर्पित असतो. महागौरीला आदिशक्तीचे एक रूप मानले जाते. अगदी साधी वेशभूषा असलेली देवी महागौरी पांढरा रंग परिधान करते. देवीला चार भुजा आहेत. तिच्या उजव्या बाजूच्या एका हात त्रिशूल असून दुसरा हात अभयमुद्रेत आहे. तसेच डाव्या बाजूच्या एका हातात डमरू आहे आणि दुसरा हात वरमुद्रेत आहे. पांढरा बैल हे देवीचे वाहन आहे. देवीच्या पांढऱ्या वेषामुळे त्यांना श्वेतांबरधारा सुद्धा म्हटले जाते.
 
देवी महागौरी म्हणजे आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी शक्ती आहे. पौराणिक कथेनुसार, वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. वयाच्या ८ व्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात आठव्या दिवशी महागौरी देवीचे पूजन केले जाते, अशी मान्यता आहे.
Powered By Sangraha 9.0