पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शहीद पोलिसांना अभिवादन

21 Oct 2023 14:20:01
 
police-commemoration-day-tribute-by-maharashtra-cm-and-deputy-cm - Abhijeet Bharat
 
मुंबई : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावरील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
 
 
नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला आमदार सदा सरवणकर, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री शिंदे यांनी देशभरात गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या १५ पोलीस अधिकारी, १७३ पोलीस जवानांच्या माहितीच्या संदेशाचे वाचन करून श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शहिदांच्या नातेवाईकांची भेट घेवून सांत्वन केले.
 
यावेळी पोलीस महासंचालक शेठ, आयुक्त फणसळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, प्रमुख अतिथी यांनीही शहिदांच्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहिदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यावेळी विशेष पोलीस कवायतीचे संचलन पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक राजेश खोपकर, संतोष कालापहाड यांनी केले.
Powered By Sangraha 9.0