मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला रिपब्लिकन पक्षाचा सर्व जागांवर पाठिंबा - रामदास आठवले

20 Oct 2023 15:38:13

ramdas athawale
 
भोपाळ :
पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Madhya Pradesh Assembly Elections) रणशिंग सर्व राजकीय पक्षांनी फुंकले आहे. त्या पार्श्वभुमीवर गुरुवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण, केंद्रीय कॅबिनेट मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्यप्रदेश भाजपचे अध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांची गुरुवारी भोपाळमध्ये भेट घेऊन मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष एक ही उमेदवार उभा करणार नाही, सर्व जागांवर भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा राहील, असे यावेळी रामदास आठवले यांनी जाहीर केले.
 
मध्यप्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत विचारविनीमय करुन भाजपला सर्व जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रिपाइंचे मोहम्मद एहसन, राजेश खडसे, संजय गारगव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
मध्यप्रदेशच्या विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यापैकी एकाही जागेवर रिपब्लिकन पक्ष उमेदवार उभा करणार नाही. सर्व जागांवर भाजपला मित्र पक्ष म्हणून पाठिंबा देणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात अत्यंत चांगले काम झालेले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्या नेतृत्वात भाजपला या विधानसभा निवडणुकीत बहुमत निश्चित मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. भाजपची पुन्हा मध्यप्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर सत्तेमध्ये रिपब्लिकन पक्षाला काही प्रमाणात वाटा मिळेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
 
मध्यप्रदेश विधानसभेच्या 35 जागा या अनुसुचित जातीसाठी राखीव आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सिमा भागात रामदास आठवलेच्या प्रचारसभा भाजपतर्फे आयोजित करण्यात येणार आहेत. आणि भाजपला मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष साथ देणार असल्याची ग्वाही रामदास आठवले यांनी यावेळी दिली.
Powered By Sangraha 9.0