(Image Source : Internet)
नागपूर :
आज नवरात्राचा (Navratri 2023) सहावा दिवस आहे. या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. कात्यायनी ही बुद्धिमत्ता आणि शांतीचीचे प्रतीक असलेली देवी मानली जाते. नवरात्राच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ विविध रूपांच्या पूजनासाठी प्रत्येक दिवस समर्पित असतो.
कात्यायनी देवीला धैर्याचे प्रतीक मानले जात असून ती सर्वात आक्रमक अभिव्यक्तींपैकी एक आहे, असेही म्हणतात. तसेच षष्ठी म्हणूनही ओळखली जाणारी कात्यायनी देवी ही दुर्गा देवीचा अवतार आहे. देवी कात्यायनीला ब्रह्मदेवाची मानसकन्या म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, पूर्वी महर्षी कात्यायन नावाचा एक ऋषी होते. ते देवी शक्तीचे मोठे भक्त होते. देवी शक्तीने आपल्या कन्येच्या रूपात जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या तपश्चर्येंनंतर कात्यायनी देवीने महर्षीच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला.
कात्यायनी देवीला चार भुजा असून ती सिहारुढी देवी आहे. देवीच्या दोन हातात तलवार आणि कमळ आहे. याशिवाय अन्य दोन हातात देवीने अभय मुद्रा आणि वर मुद्रा धारण केली आहे. जात्यायनी देवी तेजस्वी असून तिच्यापासून अंधार आणि वाईट गोष्टी लपून राहू शकत नाहीत. असे मानले जाते की, ती भक्तांना शांतता आणि आंतरिक शांतीची भावना देते. भक्त कात्यायनी देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करतात. देवी कात्यायनी आपल्या भक्तांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करते आणि त्यांना आनंद प्रदान करते.
आज परिधान करावा हिरवा रंग
आज नवरात्राच्या सहाव्या दिवशी हिरवा रंग परिधान करण्याला महत्व आहे. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतिक आहे. तसेच हा रंग सौभाग्य, प्रकृती, विकास आणि स्थिरतेचे प्रतिनिधित्व करतो. कात्यायनी देवीला देखील हिरव्या रंग अर्पित केला जातो.