नागपूर शहराचे अमृत कलश होणार मुंबईला रवाना

20 Oct 2023 18:14:08
- ढोल ताशाच्या गजरात मनपाच्या स्वयंसेवकांकडे अमृत कलश सुपूर्द
- देशभक्तीच्या मंगलमय वातावरणात निघाली अमृत कलश यात्रा

Amrut Kalash handed over to the municipal volunteers 

नागपूर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील माती राज्याची राजधानी मुंबई येथे पाठविण्यासाठी गुरूवारी संविधान चौक ते मनपा मुख्यालयापर्यंत अमृत कलश (Amrut Kalash) यात्रा काढण्यात आली. यावेळी ढोल ताशाच्या गजरात मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मनपाच्या दोन स्वयंसेवकांकडे नागपूर शहराच्या मातीचे कलश सुपूर्द केले.
 
 
 
नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमधून संकलीत मातीचे कलश सन्मानपूर्वक रथामधून संविधान चौक येथे आणण्यात आले. संविधान चौकातून ढोल ताशा पथक, लेझिम आणि देशभक्तीपर गीतांच्या गजरात नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आण्यात आले. दहाही झोनस्तरावर नागरिकांनी अर्पित केली माती आणि तांदळाचे मनपा मुख्यालयातील हिरवळीवर एक अमृत कलश तयार करण्यात आले. नागपूर शहराचे अमृत कलश आता लवकरच राज्याची राजधानी मुंबईला रवाना होणार आहे.
 
ढोल ताशांच्या गजरात देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत अशा मंगलमय वातावरणात आणि 'भारत माता की जय'च्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमले. श्वेत शुभ्र वस्त्र परिधान करून, डोक्यावर फेटा घालून निघालेल्या अमृत कलशांना यात्रेचे मनपात मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, निगम सचिव प्रफुल्ल फरकासे, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, डॉ. गजेंद्र महल्ले, लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक महेश धामेचा, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, विजय हुमणे, गणेश राठोड, सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत, शिक्षणाधिकारी साधना सयाम, कार्यकारी अभियंता अजय मानकर, अजय पझारे, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, श्रीकांत वैद्य यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
शिवमुद्रा ढोल ताशा पथक आणि मनपाच्या विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या लेझीम पथकाने भव्य अमृत कलश यात्रेचे संचालन केले. मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरण या यात्रेचे मनपा आवारात आगमन झाले. सर्वात पुढे श्वेत अश्व मागे लयबद्ध वादन आणि त्यावर लेझीम पथकाने धरलेला ठेका त्या पाठोपाठ डोक्यावर फेटा आणि श्वेत वस्त्र परिधान केलेले अधिकारी आणि त्या मागे शिस्तबद्ध पद्धतीने दहाही झोनस्तरावरुन आणलेले अमृत कलश हे या भव्य यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. यात्रा बघण्यासाठी नागरिकांनी एकाच गर्दी केली. यात्रेचे मनपात आगमन होताच शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने अमृत कलशांना मानवंदना दिली. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर हे अमृत कलश ठेवण्यात आले. प्रत्येक कलशातून काही प्रमाणात नागरिकांनी अर्पित केलेली मुठभर माती व तांदुळ संकलित करून सर्व कलशांचे एक कलश तयार करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते या कलशात माती अर्पित करण्यात आली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी नागपूर शहराच्या मातीचे अमृत कलश प्रतीक तुरुतकाने, शुभम सुपारे यांना सुपूर्द केले. हे दोन्ही स्वयंसेवक हे अमृत कलश घेऊन प्रथम मुंबई आणि तेथून राजधानी दिल्ली येथे जाणार आहेत.
 
यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले की, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनस्तरावरुन भजन गात व नागरिकांचे प्रबोधन करीत अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती. यात विविध झोनमध्ये स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, गणमान्य व्यक्तींसह सर्वसामान्य नागरिकांनी यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित मुठभर माती व तांदूळ या अमृत कलशामध्ये अर्पित केले. मनपाच्या दहाही झोन स्तरावरील अमृत कलशांचे मनपा मुख्यालयात आगमन झाले असून, येत्या २७ ऑक्टोबरला हे कलश राज्याची राजधानी मुंबई येथे येण्यात येणार आहे. येथून कलश देशाची राजधानी दिल्ली येथील कर्तव्य पथवर अमृत वाटिकेसाठी पाठविले जाणार आहे. या यात्रेला नागरिकांनी दर्शविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल डॉ. लहाने यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0